
वेंगुर्ले : रक्तपेढीच्या मागणीनुसार वेताळ प्रतिष्ठानने अगदी १५ दिवसांच्या आत पुन्हा आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात २५ जणांनी रक्तदान केले. प्रतिष्ठानच्या या सामाजिक समरसता जपण्याच्या प्रयत्नाबाबत लाईफ टाईम हॉस्पिटल रक्तपेढीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरज वानखेडे यांनी त्यांचे ऋण व्यक्त केले. तर हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे उपस्थितांमधून ब-याच जणांना रक्तदान करता आले नाही. हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी वेताळ प्रतिष्ठानने प्रचार प्रसिद्धी करावी असे आवाहन केले.
वेताळ प्रतिष्ठान, तुळस ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सावंतवाडा उत्कर्ष कला क्रीडा मंडळ तुळस व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान शाखा वेंगुर्ला या सहयोगी संस्थांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन निवृत्त बँक अधिकारी, जैतिराश्रीत संस्थेचे कार्यवाह बन्सी चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी सरपंच रश्मी परब, उपसरपंच सचिन नाईक, सदस्य जयवंत तुळसकर, नारायण कोचरेकर, रतन कबरे, मनिष यादव, विवेक तिरोडकर, प्रकाश परब, अरुण सावंत, बाबली गवंडे, सिद्धार्थ पराडकर आदी उपस्थित होते. सर्व रक्तदात्यांचा प्रमाणपत्र व रोप देऊन सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन गुरुदास तिरोडकर तर आभार माधव तुळसकर यांनी मानले.










