वेंगुर्ला नगरपरिषदेच्या 'अमृत कलश यात्रे' ला उत्स्फूर्त प्रतिसाद..!

Edited by: दिपेश परब
Published on: September 16, 2023 14:33 PM
views 159  views

वेंगुर्ला : नगरपरिषदेमार्फत शहरात काढण्यात आलेल्या “अमृत कलश यात्रे”ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्‍वातंत्र्याच्‍या अमृत महोत्‍सव अंतर्गत “मेरी मिट्टी मेरा देश” अर्थात “माझी माती माझा देश” या अभियानाचा दुसरा टप्‍पा ‘’अमृत कलश यात्रा’’ आहे. वेंगुर्ला नगरपरिषद प्रशासकीय इमारतीच्या परिसरात अमृत कलश यात्रेचा शुभारंभ मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्‍या हस्ते करण्‍यात आला. याप्रसंगी प्रशासकीय अधिकारी संगीता कुबल, माजी नगरसेवक प्रशांत आपटे, नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी व शहरातील नागरीक उपस्थित होते. शासनातर्फे हा देशव्‍यापी उपक्रम राबविण्‍यात येत असून या अंतर्गत उत्‍सवी स्वरुपाच्‍या वातावरणात प्रत्‍येक शहरांच्‍या, गावांच्‍या घराघरातून माती संकलित करण्‍याच्या सुचना राज्‍य शासनाकडून देण्यात आल्या आहेत. त्‍याअनुषंगाने वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत ही अमृत कलश यात्रा काढण्‍यात आली.

ही अमृत कलश यात्रा ढोल व ताशांच्‍या गजरात वेंगुर्ला नगरपरिषद कार्यालय- प्राथमिक शाळा नं.३ –वेंगुर्ला हायस्‍कुल वेंगुर्ला – आनंदवाडी- सातेरी मंदिर वेंगुर्ला – तालुका स्‍कुल शाळा नं. ४ – बस स्‍थानक वेंगुर्ला- तालुका स्‍कुल नं.२- वेंगुर्ला नगरपरिषद या मार्गे काढण्‍यात आली. सर्व शाळांतील विद्यार्थ्‍यांनी जय जवान जय किसान, भारत माता की जय, वंदे मातरम , माझी माती माझा देश हे नारे देत आपल्या देशाप्रती असलेली प्रेम व निष्‍ठा व्‍यक्त केली. या अमृत कलश यात्रेस वेंगुर्लावासीयांनी उत्‍स्फूर्त प्रतिसाद देवून ‘’माझी माती माझा देश’’ या अभियानाचा समारोप केला.