
देवगड : कोकण विभागातील पर्यटनाला चालना देणे तसेच स्थानिक पर्यटन आणि सांस्कृतिक वारशाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन विभागामार्फत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सुवर्ण वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘आंबा महोत्सव २०२६’ला पर्यटकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पर्यटन विभागाचे उपसचिव श्री. संतोष रोकडे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले असून, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्थानिक उत्पादनांचे प्रदर्शन आणि कोकणातील पारंपरिक खाद्यसंस्कृतीमुळे महोत्सवाला विशेष रंगत प्राप्त झाली आहे.
फार्म टू टेबल या संकल्पनेवर आधारित ‘आंबा महोत्सव २०२६’चे आयोजन मा. पर्यटन मंत्री श्री. शंभूराज देसाई तसेच मा. पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे. तसेच मंत्री मत्स्यव्यवसाय व बंदरे तथा पालकमंत्री, सिंधुदुर्ग जिल्हा नितेश राणे यांच्याही या महोत्सवाला मोलाचे सहकार्य लाभले आहे
मा. अपर मुख्य सचिव (पर्यटन) संजय खंदारे (भाप्रसे) आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे मा. व्यवस्थापकीय संचालक नीलेश र. गटणे (भाप्रसे) यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे.
तसेच पर्यटन विभागाचे उपसचिव संतोष रोकडे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यांच्यासह संबंधित विभागीय अधिकारी आणि रिसॉर्ट व्यवस्थापन पथक महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी समन्वयाने कार्यरत आहेत.
महोत्सवात सहभागी झालेल्या आंबा उत्पादकांना ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, कोकणातील प्रसिद्ध हापूस आंब्यांच्या विविध प्रकारांना विशेष मागणी असल्याचे चित्र दिसून आले. पर्यटकांनी स्थानिक शेतकऱ्यांकडून थेट आंबा खरेदीस प्राधान्य दिल्याने ‘फार्म टू टेबल’ संकल्पनेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी पर्यटकांसाठी मार्गदर्शकांच्या माध्यमातून परिसरातील विविध पर्यटन स्थळांची माहिती देण्यात आली. यावेळी पर्यटन विभागाचे उपसचिव संतोष रोकडे तसेच पर्यटन विभागातील अधिकारी वर्गाने नजिकच्या पर्यटन स्थळांना भेट देत स्थानिक पर्यटन विकासाच्या विविध शक्यता जाणून घेतल्या. कोकणातील नैसर्गिक पर्यटन, ग्रामीण पर्यटन आणि सांस्कृतिक पर्यटनाला चालना देण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
‘आंबा महोत्सव २०२६’मध्ये ‘स्ट्रीकोन’ (Streekon) या उपक्रमाच्या माध्यमातून महिला-नेतृत्वाखालील हरित पर्यटन अनुभवांना विशेष स्थान देण्यात आले आहे. कोकणातील पारंपरिक खाद्यसंस्कृती, स्थानिक उत्पादन आणि शाश्वत उपजीविकेचा अनोखा संगम या उपक्रमातून अनुभवायला मिळत आहे. कोकणातील खाद्यसंस्कृती ही येथील निसर्ग, ऋतुचक्र आणि पारंपरिक ज्ञानाशी जोडलेली असून, महिलांनी तयार केलेल्या विविध स्थानिक उत्पादनांना पर्यटकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
हंगामी फळांपासून तयार होणारे जॅम, ज्यूस, कच्च्या केळ्याचे पीठ, मसाला मिश्रणे यांसारख्या उत्पादनांनी पर्यटकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. हा उपक्रम केवळ खाद्यपदार्थांपुरता मर्यादित नसून स्थानिक अन्नउत्पादन, पारंपरिक पद्धतीने त्याची तयारी आणि त्यामागील शाश्वत जीवनपद्धती यांचा परिचय करून देणारा ठरत आहे.
महोत्सवात उभारण्यात आलेल्या नर्सरी विभागालाही पर्यटकांनी मोठी पसंती दिली. येथे ३० हून अधिक कलमी रोपे पाहण्याची तसेच खरेदी करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्थानिक जैवविविधता, पर्यावरणपूरक उपक्रम आणि वृक्षसंवर्धनाबाबत पर्यटकांमध्ये विशेष उत्सुकता दिसून आली.
यावेळी उपसचिव संतोष रोकडे यांनी पर्यटन विभागाच्या विविध योजनांची उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. विशेषतः ‘आई’ धोरणाचा उल्लेख करत स्थानिक युवक, महिला आणि उद्योजकांनी पर्यटन क्षेत्रात पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. शाश्वत पर्यटन विकासासाठी स्थानिक सहभाग, पारंपरिक ज्ञानाचे संवर्धन आणि ग्रामीण भागातील रोजगारनिर्मिती महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.
रात्री सादर करण्यात आलेल्या दत्तमाऊली दशावतार नाट्यप्रयोगाने महोत्सवात सांस्कृतिक रंग भरला. कोकणातील पारंपरिक लोककलेच्या या सादरीकरणाला पर्यटकांनी उत्स्फूर्त दाद दिली. कोकणातील सांस्कृतिक वारसा, खाद्यपरंपरा, स्थानिक उत्पादने आणि पर्यटनाचा अनोखा मिलाफ अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक ‘आंबा महोत्सव २०२६’ला भेट देत आहेत.










