
सावंतवाडी : तब्बल पन्नास वर्षाहून जास्त काळ पत्रकारिता करणारे, सावंतवाडीच नव्हे तर अवघ्या कोकणच्या साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रात आपला आगळा वेगळा ठसा उमटवणारे, मालवणी भाषेच्या दैनंदिन वापरासाठी आग्रह धरणारे, महाराष्ट्र राज्याच्या तीनपेक्षा जास्त मुख्यमंत्र्याचे माजी माहिती अधिकारी म्हणून काम केलेले अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आणि सावंतवाडीचे सुपुत्र सतीश पाटणकर यांच्या 'जाऊ तिथे खाऊ' हे महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृतीवर आधारित व कोकणातील जी तब्बल ३९ नररत्ने होऊन गेली त्या विविध क्षेत्रातील ज्या महानुभावानी आपल्या कर्तृत्वाचा ठसा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटवला त्यांचा आढावा घेणारे दुसरे पुस्तक म्हणजे 'कोकणातील आयकाॅन' या दोन्ही पुस्तकांचा प्रकाशन सोहळा महाराष्ट्राला सुपरिचित असणारे व महाराष्ट्राच्या मराठी साहित्य विश्वात ज्यांचं फार मोठं नाव आहे असे ज्येष्ठ कवी व गीतकार प्रा. अशोक बागवे, पन्नास वर्षांपूर्वी 'सामना' या अजरामर मराठी चित्रपटाची निर्मिती ज्यानी केली जे वात्रटिकाकार म्हणून प्रसिद्ध आहेतचं पण जे आपल्या वात्रटिकांच्या माध्यमातून दिवसेंदिवस ऱ्हास होत चाललेल्या सामाजिक आणि राजकीय मुल्यांवर थेट प्रहार करतात ते ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे आणि सामाजिक संवेदनाना आपल्या विनोदी शैलीनी रसिक प्रेक्षकांना खळखळून हसवणारे घराघरात पोहचलेले जेष्ठ कवी अशोक नायगावकर या तिन्ही श्रेष्ठ व ज्येष्ठ साहित्यिकांच्या प्रमुख उपस्थितीत सावंतवाडी संस्थानच्या एकोणिसाव्या पिढीचे प्रतिनिधी युवराज लखमराजे भोंसले व सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या शुभहस्ते हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व एकनाथ शिंदे यांनी श्री पाटणकर यांना आवर्जून पाठवलेल्या शुभसंदेशाचे वाचन युवा पत्रकार विनायक गांवस यानी केले. तर लेखक श्री सतीश पाटणकर यांचा परिचय व पुस्तकांची त्रोटक माहिती पर्यटन व्यवसायिक महासंघाचे कार्यवाह ॲड . नकुल पार्सेकर यांनी करून दिली. आपल्या मनोगतात लेखक पाटणकर यांनी आपल्या आतापर्यंतच्या वाटचालीतील संपूर्ण प्रवास आणि या प्रवासात ज्या असंख्य व्यक्तीनी सहकार्य केले आणि प्रेरणा दिली ज्यामुळे हा संपूर्ण प्रवास सुखमय झाला यासाठी कृतज्ञता व्यक्त केली.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तातडीची आढावा बैठक आयोजित केल्याने पालकमंत्री नितेश राणे यांना अचानक मुंबईला जावे लागत असल्याने त्यांच्या वतीने उपस्थित असलेले जिल्हा बॅकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी शुभेच्छा देताना "विद्यमान पालकमंत्री हे रिजल्ट ओरीयंटेड काम करणारे असल्याने हा जिल्हा पर्यटन द्रुष्टीने विकसित करण्यासाठी कालबद्ध कृती आराखडा आखला जाईल आणि त्यासाठी पाटणकरां सारख्या अनुभवी लोकांचे मार्गदर्शन घेतले जाईल असे सुतोवाच करून पाटणकरांचे विशेष कौतुक केले.
माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, युवराज लखमराजे यांनीही यावेळी शुभेच्छा दिल्या. प्रेस क्लबचे संस्थापक अध्यक्ष सीताराम गावडे यांच्या मालवणी भाषेतील गाऱ्हाण्यानी कार्यक्रमात वेगळीच रंगत आणली. व्यासपीठावर उपस्थित तिनही ज्येष्ठ साहित्यिक तसेच युवराज लखमराजे भोंसले, मनिष दळवी, पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगराध्यक्षा सौ. श्वेता शिरोडकर, लोकमतचे आवृत्ती प्रमुख महेश सरनाईक, काव्य मैफिलीचे निवेदन करणारे निवेदक व कवी सुधीर चित्ते, ज्यांच्या मुळे ही दोन्ही पुस्तके वेळेत प्रकाशित होवू शकली ते स्वामीराज प्रकाशनचे ज्येष्ठ पत्रकार, प्रकाशक रजनीश राणे, पर्यटन महासंघाचे नंदू तारी यांचा पाटणकर कुटुंबियांच्या वतीने ह्यद्य सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला पाटणकर यांच्या सौभाग्यवती सौ. ममता पाटणकर, मुलगा दत्तप्रसाद पाटणकर, जावई ऋषीकेश बेर्डे व सर्व पाटणकर कुटुंबिय, ज्येष्ठ संपादक गजानन नाईक, सीताराम गावडे, अभिमन्यू लोंढे, राजू तावडे, राजेश मोंडकर, प्रेस क्लबचे अध्यक्ष अनंत जाधव, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, दैनिक कोकणसादचे संपादक संदीप देसाई, सचिन रेडकर, हर्षवर्धन धारणकर, कोमसाप सावंतवाडी शाखा अध्यक्ष ॲड. संतोष सावंत, विनायक गांवस, सचिव प्रा. प्रतिभा चव्हाण, पर्यटन व्यवसायिक महासंघाचे पदाधिकारी, पत्रकार संघाचे पदाधिकारी, राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या माजी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी, कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे पदाधिकारी तसेच सर्व वृत्तपत्र आणि समाज माध्यमांचे प्रतिनिधी व विविध क्षेत्रातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रा. रुपेश पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात प्रा. अशोक बागवे, वात्रटिकाकार श्री रामदास फुटाणे व कवी अशोक नायगावकर यांच्या काव्य मैफिलीनी कार्यक्रमाची सांगता झाली.