
सिंधुदुर्ग : भावा-बहिणींच्या अतुट प्रेमाचे प्रतीक म्हणून साजरा केला जाणारा रक्षाबंधनाचा सण यंदा १९ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने, या सणाची जय्यत तयारी सिंधुदुर्ग पोस्ट विभागाने केली आहे. लाडक्या बहिणींच्या राख्या सुरक्षितरीत्या भाऊरायापर्यंत पोहोचाव्यात यासाठी खास आकर्षक असे वॉटरप्रूफ पाकिटे पोस्ट खात्यामार्फत जिल्ह्यातील सर्व पोस्ट कार्यालयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. संपूर्ण सिंधुदुर्ग विभागात जवळपास १२००० राखी लखोटे विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत.
भावा-बहिणींच्या अतुट प्रेमाचे प्रतीक म्हणून रक्षाबंधन सणाकडे पाहिजे जाते. एक मेकांपासून दूरवर राहत असलेल्या बहीण-भावांनाही हा सण साजरा करता यावा व या अतूट नात्याचे प्रतिक असलेली राखी लाडक्या भाऊरायाला पाठविता यावी, यासाठी जिल्हा पोस्ट विभाग कटिबद्ध आहे. रक्षाबंधन सण साजरा करण्यासाठी तसेच बाहेरगावी राहत असलेल्या भावाला राखी पाठविण्यासाठी डाक विभागाने खास आकर्षक डिझाइनमध्ये व वॉटरप्रूफ असलेले पाकीट विक्रीसाठी उपलब्ध केले आहेत. या पाकिटातून पोस्टाद्वारे पाठवल्या जाणाऱ्या राख्यांसाठी स्वतंत्र सेवा डाक विभागाकडून राबवली जात आहे.
रक्षाबंधन सणानिमित्त ज्या बहिणीला भावाकडे अथवा भावाला बहिणीकडे प्रत्यक्ष जाता येत नाही, त्यांच्यासाठी डाक विभागाने वॉटरप्रूफ व खास रक्षाबंधनाचे डिझाइन असलेले पाकीट तयार केले आहे राख्या सुरक्षित व वेळेत पोहोचविण्यासाठी स्वतंत्र छाटणी, पॅकिंग व ते वेळेत पोहोचविण्यासाठी यंत्रणा कार्यरत राहणार आहे. पोस्ट विभागाच्या वतीने रक्षाबंधन सणानिमित्त पूर्ण तयारी करण्यात आली आहे
रक्षाबंधनसाठी राखी कव्हरची खास सुविधा पोस्ट विभागात उपलब्ध आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व रंगाचे आकर्षक राखी कव्हर जिल्ह्यातील सर्व पोस्ट कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत. पाकीट वॉटरप्रूफ असल्याने राखी खराब होण्याचा धोका यामुळे नसणार आहे. स्पीड, साधे व रजिस्टर पोस्ट सुविधा* : लाडक्या बहिणींच्या राख्या वेळेत व सुरक्षितरित्या भावापर्यंत पोहोचाव्या यासाठी पोस्ट विभागाच्या स्पीड, साधे व रजिस्टर पोस्ट सेवा उपलब्ध राहतील. डाक विभागाकडून रक्षाबंधनासाठी १२००० पाकिटे उपलब्ध करण्यात आली आहेत.
ग्रामीण भागातील ३१६ शाखा कार्यालयांमध्ये उपलब्ध*: डाक विभागाने ग्रामीण भागातील सर्व पोस्ट कार्यालयांमध्ये सदर राखी कव्हर उपलब्ध व्हावेत, या हेतूने ग्रामीण भागातील सर्व छोट्या शाखा घरांमध्ये ६००० हून अधिक पाकिटे पाठविलेली आहेत तर जिल्हातील इतर सर्व कार्यालयात उर्वरित पाकिटे उपलब्ध राहणार आहेत. एका पाकिटाची किंमत १२ रुपये राहणार आहे.