एसपी सौरभ अग्रवाल यांनी केलं कुडाळ पोलीस ठाण्याची निरीक्षण तपासणी

Edited by: नागेश दुखंडे
Published on: December 01, 2024 12:13 PM
views 220  views

कुडाळ : कुडाळ पोलीस ठाण्याचे वार्षिक निरीक्षण तपासणी पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी केले. यावेळी पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा दरबार घेऊन त्यांच्या वैयक्तिक, कौटुंबिक, वैद्यकीय अडीअडचणी बाबत माहिती घेऊन जास्तीत जास्त अडचणींचे निरसन केले.

कुडाळ पोलीस ठाण्याची वार्षिक निरीक्षण तपासणी नुकतीच कुडाळ पोलीस ठाणे येथे संपन्न झाली. ही तपासणी पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी घेतली. या तपासणीमध्ये पोलीस ठाण्यातील प्रलंबित गुन्हे, गंभीर गुन्हे, महिलांविरुद्धचे गुन्हे, सायबर गुन्हे इत्यादी बाबत आढावा घेऊन योग्य पद्धतीने तपास करावा तसेच गुन्हे शाबीतीच्या दृष्टीने समन्स, वॉरंट योग्य वेळी बजावणी करून फिर्यादी, पंच, साक्षीदार इत्यादींशी समन्वय ठेवून जास्तीत जास्त गुन्हे शाबित होतील याकडे लक्ष देण्याबाबत पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांना सूचना दिल्या त्यानंतर पोलीस अंमलदार यांच्याशी वैयक्तिक बोलवून त्यांना भारतीय न्याय संहिता २०२३ व भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ या नवीन कायद्याविषयी मार्गदर्शन करून त्यांचे पोलीस विभागातील कामकाजाचे मूल्यमापन करून सेवा पुस्तकात तशा नोंदी घेण्यात आल्या. तसेच कुडाळ पोलीस ठाण्याच्या वार्षिक तपासणी दरम्यान पोलीस पाटील यांची देखील बैठक घेण्यात आली. यावेळी ६८ पोलीस पाटील उपस्थित होते. 

बैठकीमध्ये उपस्थित पोलीस पाटील यांची ओळख करून घेऊन त्यांना आप- आपल्या गावातील व शहरातील छोट्या- मोठ्या सर्व घडामोडी आपले बीट अंमलदार तसेच दूरक्षेत्र अमलदार यांना द्यावेत. तसेच गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार नाही याची दक्षता घेण्याबाबत सूचना दिल्या. त्यानंतर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा दरबार घेऊन त्यांच्या वैयक्तिक, कौटुंबिक, वैद्यकीय अडीअडचणी बाबत माहिती घेऊन जास्तीत जास्त अडचणींचे निरसन त्यांनी केले.