
सावंतवाडी : तालुक्यातील सोनुर्ली गावात, गावकर कुटुंबाचा 'बारा-पाच' गणपती उत्सव केवळ एक धार्मिक कार्यक्रम नसून पिढ्यानपिढ्या चालत आलेली एक अनोखी परंपरा आहे. ही परंपरा एकत्र कुटुंबाच्या एकोप्याची आणि श्रद्धेची साक्ष देते.
या उत्सवातील मुख्य आकर्षण म्हणजे ९ फूट उंच असलेली गणपतीची मूर्ती आहे. ही मूर्ती केवळ भव्य नसून, कुटुंबातील सदस्यांनी परंपरेनुसार हाताने घडवलेली आणि रंगवलेली आहे. या गणपतीला सोन्याच्या दागिन्यांनी आणि रंगीबेरंगी फुलांच्या माळांनी सजवलेले आहे. मूर्तीचा रंग फिकट केशरी असून त्यावर सोनेरी रंगाची नक्षीकाम केलेली आहे. गणपतीच्या मूर्तीस पिवळ्या आणि हिरव्या रंगाचे सुंदर वस्त्र परिधान केले आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी महापूजेने या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होते. या अकरा दिवसांच्या उत्सवासाठी मुंबईसारख्या शहरातून नोकरी-व्यवसायासाठी गेलेले कुटुंबीय खास गावी येतात. ते आपल्या लाडक्या बाप्पासाठी दागिने आणि सजावटीचं साहित्य घेऊन येतात, जे या उत्सवाचा उत्साह वाढवतो. या काळात कुटुंबातील प्रत्येक सदस्य उत्सवात सहभागी होतो. नैवेद्यासाठी विविध प्रकारचे पदार्थ बनवले जातात. जे एकत्र करून बाप्पाला अर्पण केले जातात. ही केवळ एक पूजा नसून एकत्र जेवण करून एकोप्याची भावना वाढवणारा एक आध्यात्मिक सोहळा असतो.
धार्मिक विधींसोबतच हा उत्सव सांस्कृतिक कार्यक्रमांसाठीही प्रसिद्ध आहे. पारंपरिक हलते देखावे, फुगड्या, भजने आणि आरत्यांनी संपूर्ण परिसर दुमदुमून जातो. हा उत्सव लहान-थोरांच्या आनंदाला पारावार उरू देत नाही. शेकडोजण या गांवकर कुटुंबात असून त्यांचा हा एक गणपती आहे. ज्याला बारा-पाचाचा गणपती असे संबोधले जाते.अनंत चतुर्दशीला बाप्पाला निरोप दिला जातो. ही मिरवणूक एखाद्या सोहळ्यासारखी असते, ज्यात फटाक्यांची आतषबाजी आणि ढोलांच्या गजरात मूर्तीचे विसर्जन होते. सोनुर्लीचा 'बारा-पाच' गणपती ही कोकणच्या संस्कृतीची खरी ओळख आहे.










