सोनुर्लीची लोटांगणाची जत्रा १६ नोव्हेंबरला

Edited by: विनायक गांवस
Published on: November 05, 2024 18:19 PM
views 240  views

सावंतवाडी : तालुक्यातील सोनुर्ली गावची ग्रामदेवता श्री देवी माऊलीचा आगळा वेगळा असा लोटांगण जत्रोत्सव राज्यातच नव्हे तर देशात प्रसिद्ध आहे यावर्षी  शनिवार 16 नोव्हेंबर रोजी हा जत्रोत्सव साजरा होत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकुण जत्रोत्सवापैकी मोठी जत्रा म्हणून सोनुर्ली श्री देवी माऊली ची जत्रा प्रसिद्ध आहे, देवीचे महात्म्य सातासमुद्रापार पोहोचले असून नवसाला पावणारी व भक्तांच्या हाकेला धावणारी देवी म्हणून माऊली चरणी दरवर्षी हजारो भक्तगण नतमस्तक होतात. आपले अडी-अडचणी घालवण्यासाठी देवीकडे लोंटागणाचा नवस केला जातो. आणि जत्रोत्सवादिवशी रात्री तो फेडला जातो. नवसकरी महिला उभ्याने मंदिराभोवती प्रदक्षिणा घालून हा नवस फेडतात तर पुरुष जमिनीवर लोटांगण घालून नवस फेडतात. लोटांगण कार्यक्रम पाहण्यासाठी भक्त एकच गर्दी करतात देवीच्या मंदिराचा झगमगाट लोटांगणाचा उत्सव आणि देवीचे सुखमय दर्शन डोळ्यात साठवून भाविक तृप्त होतात. दरवर्षी चार ते पाच हजार भाविक लोटांगण घालतात. जत्रोत्सवाला लोटणारी गर्दी पाहता पोलीस प्रशासनाकडूनही योग्य तो पोलीस बंदोबस्त ठेवला जातो तर देवस्थान कमिटी कडूनही भाविकांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी योग्य नियोजन केले जाते. यावर्षी शनिवार 16 नोव्हेंबरला हा जत्रोत्सव साजरा होत आहे.

 जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सध्या देवस्थान कमिटी कडून हालचालींना वेग आला आहे. मंदिर परिसराची डागडुजी अन्य सोयी सुविधा या संदर्भात देवस्थान कमिटी कडून नियोजन करण्यात येत आहे त्या दृष्टीने मंदिर परिसरात कामकाज सुरू आहे.