लोटांगण घालीतो गं आई...!

हजारो पुरुष, महिलांचा लोटांगणात सहभाग
Edited by: विनायक गावस
Published on: November 29, 2023 11:24 AM
views 570  views

सावंतवाडी : दक्षिण कोकणचं पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव मंगळवार व बुधवारी थाटात पार पडला. जिल्ह्यासह गोवा, कर्नाटक राज्यातील हजारो भक्तगण श्री देवी माऊली चरणी नतमस्तक झाले. मंगळवारी सकाळपासूनच देवी माऊलीच्या जयघोषात हजारो भक्तगणांनी देवीचे दर्शन घेतलं. भक्तांच्या मांदियाळीत कोकणची पंढरी दुमदुमून गेली होती. योग्य नियोजन केल्यामुळे यावर्षी भक्तगणांना देवीचे सुलभ दर्शन घेता आले. देवी माऊलीचा हा उत्सव लोटांगणाकरिता प्रसिद्ध आहे. रात्री साडे अकरा वाजता लोटांगणाला सुरूवात झाली. हा कार्यक्रम रात्री दिड वाजेपर्यंत सुरू होता.


प्रथम कुळघराकडून वाजत गाजत देवीची पालखी श्री देवी माऊली मंदिरकडे आली. त्यानंतर धार्मिक कार्यक्रम झाल्यावर प्रथम पुरुषांच्या लोटांगणास सुरूवात झाली. मंदिराच्या पायरीकडून लोटांगण सुरू झाले. पूर्ण मंदिराभोवती लोटांगण घातल्यानंतर मंदिराच्या दरवाजाच्या पायरीला हात लावल्यावर लोटांगण पूर्ण झाली. पुरूषांपाठोपाठ महिलांनी उभ्याने हात जोडून लोटांगण घातलं. हा लोटांगण सोहळा पहाण्यासाठी हजारो भाविक उपस्थित होते. अवसारी देवाच्या सानिध्यात ढोल ताशांचा गजर सनई चौघड्यांच्या वाद्यात हा लोटांगण सोहळा पार पडला. हजारो पुरुष व महिला यात सहभागी झाल्या होत्या. तब्बल दोन तास ही लोटांगण सुरु होती. देवस्थान कमिटी, सोनुर्ली ग्रामस्थ मंडळ, माऊली भक्तगण मंडळ, पोलीस प्रशासन यांच्या योग्य नियोजन व सहकार्यानं हा सोहळा सुनियोजितपणे पार पडला.


बुधवारी तुळाभार कार्यक्रमालाही भाविकांनी केली होती. जत्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी तुळाभार कार्यक्रम पार पडला. या तुळाभार कार्यक्रमालाही अनेक भक्तगणांनी गर्दी केली होती. ज्या भक्तगणांच्या मनोकामना पूर्ण होतात किंवा नवस पूर्ण होतात ते भक्तगण तुळाभार करतात. हा तुळाभार अन्नधान्य, वस्तू स्वरूपात असतो. धार्मिक रुढी परंपरेप्रमाणे हा कार्यक्रम झाला. बुधवारी सकाळीही असंख्य भाविकांनी देवीचे दर्शन घेऊन नवसफेड केली.