
सावंतवाडी : भक्तांच्या अलोट गर्दीत देवी माऊलीच्या नावाचा जयघोष करत हजारो पुरुष आणि महिला भाविकांनी सोनुर्लीच्या देवी माऊली चरणी लोटांगण घालून आपला नवस फेडला. शनिवारी रात्री तब्बल दोन तास मंदिर परिसरात हा सोहळा पार पडला. यानिमित्ताने दक्षिण कोकणची पंढरी असणारी सोनुर्ली गजबजून गेली होती.
हजारो हात लोटांगण सुरळीत पार पाडण्यासाठी सरसावले होते. दोन दिवसाच्या या उत्सवाची आज रविवारी तुलाभाराने सांगता झाली. दक्षिण कोकणची प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या सोनुर्ली श्री देवी माऊलीचा दोन दिवस चालणाऱ्या जत्रोत्सवाला शनिवारी रात्री तुफान गर्दी उसळली. मंदिराकडे जाणारे रस्ते आणि परिसर भक्तांच्या गर्दीने फुलून गेले होता. रात्री आठनंतर भाविकांचा जनसागर येथे पाहायला मिळाला. ठिक साडेदहा वाजता देवीची पालखी कुळघराकडून वाजत गाजत फटाक्याच्या आतषबाजीत मंदिरात दाखल झाली. विधीवत प्रथेप्रमाणे अकरा वाजता लोटांगणाच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. तत्पूर्वी भाविक भक्तांना देवीचे दर्शन आणि ओटी भरण्याचे काम अविरत सुरु होते. पालखी मंदिरात आल्यानंतर सभामंडपाच्या पायरीपासून लोटांगणाला सुरूवात झाली. मंदिराला प्रदक्षिणा पूर्ण करीत त्याच पायरीपर्यंत येऊन ती पूर्ण केली. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही हजारो महिला पुरुष भक्तांनी लोटांगण घालून आपल नवस फेडला. यावर्षीही महिला भाविकांची संख्या लक्षणीय होती. लोंटागणाचा कार्यक्रम सुरु होताच श्रीदेवी माऊलीच्या अवसारांनी तरंगकिठीसह भक्तांना दर्शन दिले. हा कार्यक्रम उशिरापर्यंत सुरू होता. संपूर्ण उत्सवावर देखरेख ठेवण्यासाठी पोलिस बंदोबस्त कडेकोट तैनात होता. लोटांगणाचा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर मंदिराभोवती हा नयनरम्य क्षण पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. तब्बल दोन तासाहून अधिक वेळ पुरुष भक्ताची लोटांगणे सुरु होती. त्यानंतर महिलांची लोटांगणे सुरु झाली.
दुसऱ्या दिवशी सकाळी गावातील गावकरी मंडळी केळीकुळ आदींनी देवीच्या दर्शनासाठी व केळी नारळ ओटी भरण्यासाठी गर्दी केली होती. याचवेळी सुरू असलेल्या तुलाभार कार्यक्रमालाही मोठी गर्दी होती. अडीअडचण असलेल्या भाविकांनी आपल्या वजनाएवढे वस्तू देऊन नवस फेडला. हा कार्यक्रम उशिरापर्यंत सुरु होता. त्यानंतर देवीच्या संचारी अवसाराने जत्रोत्सव पार पडल्याच्या कौल दिल्यानंतर जत्रौत्सवाची सांगता झाली.
विधानसभा निवडणुक अवघ्या दोन दिवसावर आली आहे. प्रत्येक उमेदवार प्रचाराच्या रणधुमाळीत व्यस्त आहे. मात्र असे असतांनाही वेळात वेळ काढत प्रत्येक उमेदवाराकडून जत्रोत्सवाला उपस्थिती दर्शवून देवीचे दर्शन घेण्यात आले. यामध्ये शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, अर्चना घारे, राजन तेली यांनी देवीचे दर्शन घेतले. देवस्थान कमिटीकडून सर्वाचा यथोचित सत्कार करण्यात आला.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पोलिस प्रशासनाने वाहतुकीचे चोख नियोजन केल्याने संपुर्ण जत्रौत्सवात काहीच अडचण व अनुचित घडले नाही, अपुऱ्या पार्किंग व्यवस्थेअभावी काही ठिकाणी वाहतूक कोंडी वगळता जत्रौत्सव सुरळीत पार पडला. सोनुर्ली जत्रौत्सवाला दरवर्षी एसटी महामंडळाकडून जादा बस फेऱ्या सोडला जातात. यावर्षी एसटीकडून प्रवेशाकरिता सोय केली होती. त्यामुळेच भाविकांना सोनुर्लीत दाखल होऊन देवीचे दर्शन घेणे सोपे झाले.अनेकांनी एसटीच्या सोईबाबत आनंद व्यक्त केला.
सोनर्ली जत्रौत्सवावर पावसाचे सावट असल्याने व्यापारीवर्गातून भीती व्यक्त होत होती. मात्र संपुर्ण जत्रौत्सव पार पडेपर्यंत पावसाचे विघ्न न आल्याने व्यापाऱ्यांचा व्यवसाय होऊन मोठी उलाढाल पाहायला मिळाली.