कुडाळातील 'त्या' अपघातात जयअंबे स्वीट मार्टचे प्रकाश रायका यांच्या मुलाचं निधन

Edited by: भरत केसरकर
Published on: March 05, 2024 15:10 PM
views 1161  views

कुडाळ : मुंबई - गोवा महामार्गावर कुडाळ येथे मंगळवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात सावंतवाडी येथील "जय अंबे" स्वीट मार्टचे मालक पुखराज उर्फ प्रकाश रायका यांचे सुपुत्र रतन प्रकाश रायका (वय ४५) हे जागीच ठार झाले आहेत. ही घटना कुडाळ येथे महामार्गावरील ओव्हरब्रीजवर  घडली. दरम्यान यात अन्य तिघेजण जखमी झाले आहेत. जितेंद्र रायका, साईकिरण परब आणि निलय शरद धुरी हे जखमी झाले आहेत.

याबाबत कुडाळ पोलिसांनी  दिलेल्या माहितीनुसार, निलय शरद धुरी यांनी जी फिर्याद दिली आहे. यानुसार रतन रायका, निलय धुरी, जितेंद्र लुबांजी रायका आणि साईकिरण परब हे चारजण निपाणी येथे जत्रेसाठी गेले होते. तेथून परत येत असताना हा अपघात घडला. त्यांना अधिक उपचारासाठी गोवा येथे हलविण्यात आले आहे. तर रतन याचा मृतदेह कुडाळ येथे ठेवण्यात आला होता. शवविच्छेदनानंतर तो नातेवाईकांच्या दुपारी १२ वाजता ताब्यात देण्यात आला.

२० वर्षानंतर पुन्हा अपघात आणि पुन्हा कुटुंबांवर घाला

दुर्दैवाची गोष्ट म्हणजे २० वर्षांपूर्वी पुखराज उर्फ प्रकाश रायका यांचा चिंरजीव आणि रतन रायका यांच्या भावाचा इन्सुली घाटीत अपघात झाला होता. त्यात तो मृत झाला होता. त्यानंतर या रायका कुटुंबांवरहा  दुसरा मोठा आघात झाला आहे. रतन हा इंजिनिअर होता. राजस्थान येथील एका मायनिंग कंपनीत तो काम करत होता. तो काही दिवसापूर्वी सावंतवाडीत आला होता. 

नेमकी घटना काय घडली ? 

निपाणी येथे जत्रा असल्यामुळे सोमवारी रात्री ९ वाजता सावंतवाडीतून निपाणीला जायला निघाले. तर रात्री १२.३० वाजता ते निपाणीत पोहचले. यानंतर निपाणी येथील जत्रेत दर्शन घेवून मध्यरात्री २ वाजता निपाणीहून फोंडामार्गे सावंतवाडीत यायला निघाले. यावेळी जितेंद्र रायका हा गाडी चालवत होता. तर चालकाच्या बाजूला रतन रायका बसला होता. तर पाठीमागे निलय धुरी आणि साईकिरण परब बसले होते.

ते चौघे ही इको कारने सावंतवाडीत परत येत असताना पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ येथील ओव्हर ब्रीजवर डिव्हायडरवर आदळून हा अपघात झाला. अचानक झालेल्या हा मोठ्या आवाजाने निलय धुरी याला जाग आली तेव्हा बाजूला बसलेला साईकिरण परब आणि जितेंद्र रायका हा जखमी असल्याचे त्याला दिसले. तर रतन रायका हा गाडीत अडकलेला होता. यानंतर १०८ क्र. रुग्णवाहिका बोलावून कुडाळ ग्रामीण रूग्णालयात आणले गेले. मात्र, रतन रायका याला मृत घोषित केले. तसेच साईकिरण परब आणि जितेंद्र रायका यांना गोवा-बांबुळी येथे हलविण्यात आले. याबाबतची रितसर फिर्याद निलय धुरी ( रा. सावंतवाडी माठेवाडा) यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली आहे.

सावंतवाडी शहरावर शोककळा

रतनच्या पश्चात पत्नी, वडील, आई आणि छोटी मुलगी असा परिवार आहे. सावंतवाडीतील "जय अंबे स्वीट मार्ट" या दुकानामुळे हे कुटुंब शहरात प्रसिद्ध आहे. अनेक वर्षे ते सावंतवाडीत राहत असून अनेक लोकांशी त्यांचे जवळचे संबंध आहेत. या घटनेने सावंतवाडीत एकच शोककळा पसरली आहे.