शाळेत जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार | ग्रामस्थांचा निर्णय

Edited by: दिपेश परब
Published on: April 27, 2024 12:32 PM
views 708  views

वेंगुर्ला : तालुक्यातील उभादांडा गावातील शेकडो लोकांनी येत्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा मोठा निर्णय घेतला असून त्या सबंधीचे निवेदन आणि समर्थनार्थ शेकडो मतदारांच्या सहीचे पत्र २६ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, वेंगुर्ला-उभादांडा या गावात असलेल्या आणि १९६३ सालापासून अस्तित्वात असलेल्या ‘न्यू इंग्लिश स्कूल, उभादांडा‘ या एकमेव माध्यमिक शाळेत आजमितीला उभादांडा गावातील आणि आजूबाजूच्या गावातील शेकडो गोरगरीब विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गेली १६-१७ वर्षे शालांत परीक्षेला शंभर टक्के निकालाची परंपरा शाळेने जपली आहे. रेडी रेवस राज्यमहामार्गपासून अवघ्या ८० मीटर अंतरावर असलेल्या या विद्यालयात विद्यार्थ्याना आणि शिक्षकांना सन २०२० पर्यत पुरेसा रस्ता शाळेत जाण्या-येण्यासाठी उपलब्ध होता. मात्र कोविड काळात या जाण्या-येण्याच्या संपूर्ण रस्त्यावर झाडांची लागवड करण्यात आली. काही बांधकामे करून तसेच सांडपाण्याचा चिखल करून गावातील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे.

या बेकायदेशीर कृत्याविरोधात शाळा संस्थेने सावंतवाडी प्रांत कार्यालयात केलेला अर्ज अजून निकाली काढला गेला नाही. शाळेने पोलीस प्रशासन, तहसीलदार, लोकप्रतिनिधी, पालकमंत्री यांना वेळोवेळी निवेदने देऊन आणि तक्रारीकरुन सुद्धा कोणतीही कारवाई प्रशासन किंवा कोणत्याही लोकप्रतिनिधीकडून करण्यात आलेली नाही. अशा परिस्थितीमध्ये आज मुलांना त्याच झाडीझुडूपातून वाट काढत शाळेत जावे लागत आहे. शाळेत जाताना मुलांना इजा होण्याची तसेच त्यांच्या जीविताला धोका पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही.

१ मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा होत असताना मुलांना, शिक्षकांना आणि ग्रामस्थांना आणि ध्वजरोहणासाठी सन्मानाने शाळेत जाणेसुद्धा मुश्किल होऊन बसले आहे. या संपूर्ण प्रकारामुळे उभादांडा गावात आणि पर्यायाने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात न्याय आणि प्रशासन अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्न पडतो.

याच प्रश्नाची दखल प्रशासन आणि सर्व लोकप्रतिनिधी यांनी घ्यावी या मागणीसाठी उभादांडा गावातील या शाळेत शिकणा-या विद्यार्थ्यांचे पालक, शाळेचे माजी विद्यार्थी आणि संपूर्ण गावातील शिक्षणप्रेमी जनतेने शेकडो सह्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर केले आहे. या पत्राद्वारे कळविण्यात येते की, न्यू इंग्लिश स्कुल उभादांडा शाळेकडे जाणारा मार्ग १ मे २०२४ च्या सकाळी ७.०० वाजेपर्यंत उपलब्ध झाला नाही तर संपूर्ण उभादांडा गावतर्फे ७ मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर संपूर्ण बहिष्कार घालण्यात येईल असा इशारा दिला आहे.