
मंडणगड : इनोव्हेशन कॉम्पिटिशन डिपेक्स या पुणे येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य स्तरावरील तंत्रशोध स्पर्धेत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मंडणगडने दैदिप्यमान यश संपादित करत राज्यात दुसरा क्रमांक मिळवला. या प्रोजेक्टचे दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोतूक केले आहे. मंडणगडमधील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या या यशाबद्दल त्यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
इनोव्हेशन कॉम्पिटिशन डिपेक्स हि तंत्रशोध स्पर्धा पुणे येथील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग सीओईपी येथे दि. 3 एप्रिल ते 6 एप्रिल या रोजी संपन्न झाली. स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्यातून सुमारे 454 स्पर्धक (प्रोजेक्ट) यामध्ये सहभागी झाले होते. आयआयटी ते आयटीआय अशा वेगवेगळ्या शिक्षण स्तरातील इंजिनिअरिंग कॉलेजने यामध्ये सहभाग नोंदवला होता. रत्नागिरी जिल्हा स्तरावर रँक मध्ये असलेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मंडणगड यांचा सोलर ऑपरेटर कल्टीवेटर हा प्रोजेक्ट या स्पर्धेमध्ये सहभागी झाला होता. सर्वोत्कृष्ट प्रेझेंटेशन व ग्रीन एनर्जी बेस प्रोजेक्ट हे या प्रोजेक्टचे आकर्षण ठरले. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रोजेक्टची दखल घेऊन प्रोजेक्ट बाबत स्टॉलवर भेट देऊन माहिती घेतली. या प्रोजेक्टचे मार्गदर्शक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राध्यपक अमित तांबे व प्राध्यापक सिद्धेश चव्हाण यांनी छोट्या भाजीपाला करणाऱ्या शेतकऱ्यांकरिता सदस्य प्रोजेक्ट कसा उपयुक्त आहे याचे प्रेझेन्टेशन यावेळी केले. प्रोजेक्ट थिंक सोलर थिंक ग्रीन या बेसवर आहे.
“या प्रकल्पाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष कौतुक करून आपण अक्षय उर्जेवर काम करीत आहात की जे मोदीजींचे स्वप्न आहे असे सांगून फक्त प्रोजेक्ट पुरता हा विषय मर्यादित न ठेवता स्टार्टअप सुरू कसा होईल याबाबत प्रयत्न करा असे म्हणत पुढील कामगिरीकरिता शुभेच्छा दिल्या.”
या प्रोजेक्टमध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मंडणगडमधील सहभागी विद्यार्थी कुमार सारीपुत्र पवार, कुमार विनय गणवे, कुमार समीर मेढेकर व कुमार रोहन गुजर या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सदरचा प्रोजेक्ट हा इलेक्ट्रिशन आणि वेल्डर या दोन्ही विभागांच्या मेहनतीने तयार करण्यात आला होता. वेल्डर विभागाचे प्राध्यापक अशोक पवार, रिजा मुजावर यांचेही यामध्ये योगदान होते. प्रोजेक्ट करता आय.एम.सी. ऑफ आयटीआय मंडणगडचे अध्यक्ष देवेंद्र गुप्ता तसेच सचिव तथा संस्थेचे प्राचार्य प्रीतम शेट्ये यांचे सहकार्य लाभले. मुंबई विभागाचे सहसंचालक श्री. नितीन निकम व मुंबई विभागाच्या पाबरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरील स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविण्यात आला.