
वैभववाडी : तालुक्यातील विविध प्रश्नासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते डी. के. सुतार यांनी यांनी पुकारलेले उपोषण अखेर मंगळवारी सायंकाळी उशिरा स्थगित केले. लेखी आश्वासनानंतर उपोषण स्थगित करण्याचा डी. के. यांनी निर्णय घेतला. मात्र आश्वासनानुसार कार्यवाही न झाल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. सायंकाळी चर्चेसाठी आलेल्या अधिकाऱ्यांबाबत डी. के. सुतार यांनी नाराजी व्यक्त करीत त्यांना खडेबोल सुनावले.
तालुक्यातील एसटी बसस्थानकाचे नूतनीकरण, जुन्या बसस्थानकाची निवारा शेड हटवून बसस्थानकात जाण्यासाठी रस्ता करणे, बाजारपेठेत गटारांची व्यवस्था करणे, राज्य आणि जिल्हा परिषद मार्गालगत वाढलेले झुडपे तोडणे यासह विविध मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते श्री. सुतार यांनी येथील बाजारपेठेत मंगळवारी सकाळपासून उपोषण सुरू केले होते. सायंकाळी ५ वाजेपर्यंतपर्यंत कुणीही अधिकारी उपोषणाकडे आलेला नाही. सायकांळी प्रभारी तहसीलदार सविता कासकर, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, पोलीस निरीक्षक अमित यादव, बांधकाम विभागाचे शाखा अभियंता अमोल सुतार, याशिवाय एस टी बसस्थानकाचे अधिकारी चर्चेसाठी आले. यावेळी एसटी बसस्थानकासमोरील निवारा शेड हटविण्याचे काम सुरू करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. याशिवाय लवकरच बस स्थानकाचे नूतनीकरण होण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन दिले.
त्यानंतर जिल्हा मार्गालगत वाढलेल्या झुडुपांचा प्रश्न श्री.सुतार यांनी उपस्थित केला. ही झाडी केव्हा तोडण्यात येणार आहेत? गटविकास अधिकाऱ्यांनी काही ग्रामपंचायतींना त्यांच्या त्यांच्या कार्यक्षेत्रातील झाडी तोडण्याच्या सूचना केल्या होत्या. काही ग्रामपंचायतींनी कार्यवाही केली, परंतू काहींनी केली नाही. यावेळी श्री. सुतार यांनी जिल्हा परिषद ही झाडी का तोडत नाही? असा प्रश्न करीत तातडीने ही झाडी तोडण्यात यावीत, राज्य आणि जिल्हा मार्गावरील झाडीमुळे अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न त्यांनी विचारत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
बाजारपेठेतील गटारांसाठी ५० लाखांचा निधी मंजूर असून लवकरच या कामांची निविदा प्रकिया पूर्ण होईल. त्यानंतर या कामाला सुरूवात करण्यात येईल, असे नगरपंचायतीच्या माध्यमातून आश्वासन देण्यात आले. शहरातील समस्याबाबत भाजपचे नासीर काझी यांनी श्री. सुतार यांना आश्वासन दिले. शहरातील भुयारी गटारासह इतर जे विषय असतील त्यांची पूर्तता लवकर केली जाईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर श्री.सुतार यांना अधिकाऱ्यांनी उपोषण स्थगित करण्याची विनंती केली. त्यामुळे तूर्तास आपण उपोषण स्थगित करीत आहोत, परंतु लेखी आश्वासनानुसार जर कार्यवाही झाली नाही, तर मात्र पुन्हा कधीही उपोषण करू, असा इशारा सुतार यांनी दिला.
या उपोषणाला तालुकावासीयांसह राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला होता. काँग्रेस, शिवसेनेसह भाजपची मंडळी उपोषणस्थळी उपस्थित होते.