...तर तुमचे भ्रष्टाचाराचे वस्त्रहरण केल्याशिवाय शांत बसणार नाही ; खा. विनायक राऊत यांचे मंत्री केसरकरांवर टीकास्त्र

वेंगुर्ल्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, सदस्यांचा सत्कार
Edited by: दिपेश परब
Published on: January 24, 2023 21:38 PM
views 424  views

वेंगुर्ला: नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत वेंगुर्ल्यात चांगल्याप्रकारे सरपंच उपसरपंच सदस्य निवडून आले. इतर उमेदवारांनी सुद्धा उत्तम लढा दिला. सध्या चाललेल्या बाजारू राजकारणामध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत निवडून आलेल्या व निवडणूक लढवलेल्या सर्वांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा झेंडा फडकवत ठेवण्याच काम केलं याच कौतुक करतो. असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी वेंगुर्ले येथे केले. 
 
 हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पक्षाचे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य यांचा सत्कार सोहळा मंगळवारी (२४ जाने) येथील साई डीलक्स हॉल येथे आयोजित करण्यात आला होता त्यावेळी खासदार विनायक राऊत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर  लोकसभा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परब, शिवसेना नेते बाळा गावडे, प्रकाश गडेकर, तालुकाप्रमुख यशवंत उर्फ परब, शहरप्रमुख अजित राऊळ, युवासेना तालुकाप्रमुख पंकज शिरसाट, माजी नगरसेवक तुषार सापळे, जयप्रकाश चमणकर, माजी नगरसेविका सुमन निकम यांच्यासाहित पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 
 
 यावेळी तालुक्यातील ६ ग्रामपंचायत सरपंच, ११ उपसरपंच व ८४ ग्रा. प. सदस्य यांचा व कार्यकर्त्यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना अरुण दुधवडकर म्हणाले की, तालुकाप्रमुख यशवंत परब व सर्व टीमचे अभिनंदन करतो की तालुक्यात चांगल्याप्रकारे यश संपादन केल. निवडून आलेल्या सर्वांनी गावच्या हितासाठी काम करावे, आगामी पंचायत समिती जिल्हापरिषद साठी सर्वांनी सज्ज राहावे असे ते म्हणाले. तसेच यावेळी सर्व सरपंच यांच्या वतीने केळुस सरपंच योगेश शेटये यांनी आपले अनुभव व मार्गदर्शन केले. 

दीपक केसरकर यांच्यावर टीका 

मागे झालेल्या विधानसभा निवडणुकीत मंत्री दिपक केसरकर यांचे बारा वाजवण्याचे काम हे भाजप ने केले व येत्या विधासभेला सुद्धा तेच करणार. केसरकर यांनी प्रत्यक्ष उद्धव ठाकरे यांना आव्हान दिल आहे की, दोन दिवसात खुलासा नाही केला तर मी भांडाफोड करेन मात्र ज्या दिवशी हे धाडस कराल त्या दिवशी तुमचं पुर्णपणे भ्रष्टाचाराचे वस्त्रहरण केल्याशिवाय शांत बसणार नाही असे चोख प्रतिउत्तर विनायक राऊत यांनी बोलताना केले.

शिंदे सरकार वर जोरदार टीका 

शिंदे सरकारला शरम वाटली पाहिजे की आतापर्यंत २२ टक्के निधी सुद्धा खर्च करू शकले नाहीत. पैसे असून सुद्धा विकासाला पैसे द्यायचे नाहीत आशा पद्धतीचे दानत असणारे हे सरकार जनतेला फक्त आमिष दाखवून फसवण्याचे काम करत आहे. माझ्या स्वतःच्या प्रयत्नातून महाराष्ट्र सरकारने दिल्लीला प्रस्ताव पाठवला आणि प्रधानमंत्री स्वदेश दर्शन योजनेमध्ये आपला सिंधुदुर्ग जिल्हा मी समाविष्ट करून घेतला. १८ कोटींचा पहिला हप्ता आला. मात्र हे कोणत्या ठिकाणी खर्च केले.  आणि खर्च ज्या बाबींवर केले त्याचे आता अस्तित्व काय हे दीपक केसरकर यांनी जाहीर करावे. अशीही जोरदार टीका खा. विनायक राऊत यांनी केली.