तर... मुंबई विद्यापीठाने सिंधुदुर्ग उपकेंद्र का सुरू केले?

मनसे पदाधिकार्‍यांचा सवाल
Edited by: प्रतिनिधी
Published on: December 05, 2022 18:57 PM
views 243  views

सावंतवाडी : कर्मचारी व अधिकारीच भरायचे नव्हते, मग सावंतवाडीत मुंबई विद्यापीठाचे सिंधुदुर्ग उपकेंद्र का सुरू केले? आता येथे शिकणार्‍या मुलांचे नुकसान झाल्यास जबाबदार कोण? असा सवाल मनसेच्या पदाधिकार्‍यांनी उपकेंद्राचे प्रभारी संचालक श्रीपाद वेलींग यांना केला. दरम्यान या संदर्भात मनसेकडून करण्यात आलेल्या मागणीनुसार वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा सुरू केला आहे. याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन श्री. वेलींग यांनी मनसेच्या पदाधिकार्‍यांना दिले. मात्र हा प्रश्न तात्काळ न सुटल्यास आक्रमक पवित्र हाती घेऊ, असा इशारा उपस्थितांकडून देण्यात आला आहे.

यावेळी मनसे माजी शहराध्यक्ष तथा विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार, माजी जिल्हा उपाध्यक्ष अनिल केसरकर, शुभम सावंत, प्रकाश साटेलकर, राजेश मामलेकर, गणेश सातार्डेकर, मनोज कांबळी, सावळाराम गावडे, जयेश तुळसकर आदी उपस्थित होते.

याबाबत माहिती देताना सुभेदार म्हणाले, मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र सावंतवाडी व तळेरे येथे सप्टेंबर २०२१ पासून सुरू करण्यात आले आहे. मात्र अद्याप एकही नवीन कोर्स सुरू होऊ शकला नाही. कारण तिथे पुरेसा कर्मचारी नाही, असे दिसून येत आहे. यापूर्वी त्या ठिकाणी ३ कर्मचारी कार्यरत होते. मात्र आता ते कमी करण्यात आले आहेत. याचा अर्थ उपपरिसराचा काही विकास करायची विद्यापीठाची मानसिकता दिसून येत नाही. तर पूर्वी काम नसताना ते कर्मचारी नेमण्यात आले होते. मात्र आता गरज असताना त्या ठिकाणी कोणीही नाही. त्यामुळे आपण विद्यापीठाचा पैसा व्यर्थ खर्च करत होतो, असा आरोपही त्यांनी केला आहे.