...तर कोणाचीही गय केली जाणार नाही!

साबांचे कार्यकारी अभियंता सर्वगोड यांचा इशारा | मनसेच्या घेरावानंतर ठेकेदारांना दिल्या सूचना
Edited by: प्रतिनिधी
Published on: January 02, 2023 16:11 PM
views 290  views

सावंतवाडी : येथील कंपनीकडून खोदाई करण्यात आलेले रस्ते काम झाल्यानंतर तात्काळ ते बुजवण्यात यावेत. अन्यथा अनामत रकमेतून आम्ही बुजवू, कोणाचीही गय केली जाणार नाही. त्यामुळे अपघात होणार नाही, याची दक्षता घेऊन काम करा, अशा सूचना सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी संबंधित ठेकेदारांना दिल्या.

 सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यात गॅस पाईप लाईन घालण्यासाठी चुकीच्या पद्धतीने चर खोदले जात आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. असा आरोप करीत याबाबत गंभीर भूमिका घ्या, अशी मागणी मनसेच्या माध्यमातून बांधकाम अधिकाऱ्यांकडे सोमवारी करण्यात आली. यावेळी झालेल्या ठेकेदार अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत श्री. सर्वगोड यांनी तशा सूचना अधिकारी तसेच गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

 त्याचप्रमाणे तालुक्यातील रस्त्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली व सर्व कामे योग्य रीतीने मार्गी लागतील, असे आश्वासन बांधकाम अभियंत्यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला दिला. यावेळी मनसेचे माजी शहराध्यक्ष आशिष सुभेदार, माजी जिल्हा उपाध्यक्ष अनिल केसरकर, दोडामार्गचे माजी तालुकाध्यक्ष सुनील गवस, परिवहन माजी जिल्हाध्यक्ष राजू कासकर, मनवि सेना माजी जिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ, शुभम सावंत, कौस्तुभ नाईक, प्रवीण गवस, विष्णू मुंज, तुकाराम गवस, आबा चिपकर, अवधूत कारेकर आदि उपस्थित होते.