सावंतवाडी : राज्यात 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात 310 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर मतमोजणी तहसील कार्यालय येथे पार पडेल अशी माहिती सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी दिली.
ते म्हणाले, विधानसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज करण्याची तारीख ही 22 ऑक्टोबरपासून सुरु होईल. उमेदवार 29 ऑक्टोबरपर्यंत आपला अर्ज दाखल करु शकणार आहेत. यानंतर 30 ऑक्टोबरला सर्व उमेदवारांच्या अर्जाची छाननी होईल. तर 4 नोव्हेंबर 2024 ला पर्यंत उमेदवार आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकणार आहेत. मतदारसंघात 2 लाख 28 हजार 483 मतदार आहेत. यात महिला 1 लाख 14 हजार 433 व 1लाख 14हजार 050 पुरूष मतदार आहेत. 310 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगाच्या मतदानासाठी निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार कार्यवाही केली जाईल. विधानसभा निवडणूकीसाठी प्रशासन सज्ज असल्याचे श्री. निकम यांनी सांगितले.
दरम्यान, मतदारांना होणाऱ्या पैशाच्या वाटपाबाबत विचारलं असता निवडणूक अधिकारी म्हणाले, संबंधित प्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथक तैनात असणार आहेत. मतदारांना आमिष दाखवल जावू नये, आचारसंहितेचा भंग होऊ नये याची काळजी राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी घ्यावी असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी तहसीलदार श्रीधर पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, वेंगुर्ला तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे, मंडळ अध्यक्ष रविंद्र मडगावकर, उबाठा शिवसेनेचे शिवदत्त घोगळे, शिवसेना तालुकाप्रमुख बबन राणे, विधानसभा प्रमुख प्रेमानंद देसाई, शिवा गावडे आदी उपस्थित होते.