
वैभववाडी : तळेरे - गगनबावडा राष्ट्रीय महामार्गाच्या कामात शेतकऱ्यांना जमीनीचा मोबदला मिळाला नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने दडपशाही करून शेतकऱ्यांच्या जमिनी खोदल्या आहेत. यापुढे जमीनीचा मोबदला मिळाल्याशिवाय काम करू देणार नाही. अन्यथा न्यायालयात जाऊन कामाला स्थगिती आणू असा इशारा वैभववाडीतील शेतकऱ्यांनी दिला.
तळेरे -गगनबावडा राष्ट्रीय महामार्ग वैभववाडी तालुक्यातील नाधवडे,कोकीसरे,वाभवे,एडगाव,करुळ या गावांच्या हद्दीतून जात आहे.यात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर जमीन,झाडे गेली आहेत.मात्र याचा कोणताही मोबदला शेतकऱ्यांना मिळाला नाही.याबाबत आज प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे अधिकारी व शेतकरी यांची बैठक झाली.या बैठकीला प्रमोद रावराणे, गुलाबराव चव्हाण, सुधीर नकाशे, संजय सावंत,परशुराम इस्वलकर, नरेंद्र कोलते, सज्जन रावराणे, बंड्या मांजरेकर,विलास देसाई, यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.