सिंधुदुर्गनगरी नंतर आठही तालुक्यात कौशल्य विकास प्रशिक्षण बॅच : प्रजीत नायर

Edited by:
Published on: December 12, 2023 18:46 PM
views 172  views

सिंधुदुर्गनगरी : विश्वकर्मा कौशल्य विकास योजनेअंतर्गत सुतारकाम व बांधकाम या प्रगत प्रशिक्षणाची पहिली बॅच जानेवारी पासून सिंधुदुर्गनगरी येथे सुरु करण्यात येत आहे.त्यासाठी प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत. लवकरच आठही तालुक्यात बॅच सुरु करण्यात येणार आहेत अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांनी पत्रकार परिषद मध्ये दिली. 

यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे,भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,भागीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ प्रसाद देवधर,कसाल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाई सावंत उपस्थित होते. सिंधुदुर्गनगरी येथे पालक मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून विश्वकर्मा कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राची स्थापना करून जिल्ह्यातील तरूणांना बांधकाम व सुतारकामाचे मोफत प्रशिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषद सिंधुदुर्गने कॉज टू कनेक्ट पुणे, धी कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्था आणि भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान झाराप यांचेसोबत सामंजस्य करार केला होता. हे केंद्र कार्यान्वीत करून जिल्ह्यातील तरूणांना आत्मनिर्भर करण्यासाठी पुढचे पाऊल टाकण्याचा निर्णय आज घेण्यात आला.

१६ ते २५ वर्षे   वयोगटातील तरूणांना प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे. प्रशिक्षणाचा कालावधी ६ महीने असणार आहे. निवडक विद्यार्थ्यांना बांधकाम व सुतारकाम यापैकी एक कौशल्य शिक्षण मोफत देण्यात येणार आहे. त्यासाठी प्राप्त अर्जातून ३० विद्यार्थ्यांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल. अर्ज करण्याची मुदत दि. १२ डिसेंबर पासून दि २९ डिसेंबर २०२३ पर्यंत असणार आहे. प्रशिक्षणाची सुरूवात जानेवारी २०२४ पासून होणार आहे.

पुणे येथील अनिरुद्ध बनसोड यांच्या कॉज टू कनेक्ट पुणे या अनुभवी संस्थेद्वारे प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम तयार करण्यात आला असून प्रशिक्षण देण्याची जबाबदारी देखील संस्थेने घेतली आहे. धी कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्थेने प्रशिक्षण केंद्रासाठी इमारत व सोयी सुविधा उपलब्ध करून दिले आहेत. भगीरथ ग्राम विकास प्रतिष्ठान झाराप या प्रशिक्षणाची प्रचार प्रसिद्धी करणार आहे. जिल्हा परिषदकडून रक्कम साडेसात लाख रुपये रक्कमेचे प्रशिक्षण साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरूणांना सुतारकाम व बांधकाम क्षेत्रातील कौशल्य प्रशिक्षणातून स्वयंरोजगार निर्माण करण्याची सुवर्णसंधी या निमित्ताने उपलब्ध होणार आहे.अशी माहिती देण्यात आली व सिंधुदुर्गनगरी येथे कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीचे कामही सुरु झाले आहे टप्यापाट्याने आठही तालुक्यात कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात येणार आहे अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांनी दिली.