निवृत्त शिक्षकांचे जि. प. कार्यालयासमोर आंदोलन

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: April 06, 2026 19:40 PM
views 16  views

सिंधुदुर्गनगरी : विविध प्रलंबित आर्थिक देयकांच्या मागणीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा सेवा निवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशनच्या वतीने सोमवारी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात जोरदार घोषणाबाजी करत शिक्षकांनी संताप व्यक्त केला. निवृत्त शिक्षकांना मिळणारे जीवनवेतन, पेन्शन संबंधित देयके, तसेच इतर आर्थिक लाभ वेळेवर मिळत नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. अनेक वर्षांपासून प्रकरणे प्रलंबित असूनही प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याने शिक्षकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, वरिष्ठ व निवडश्रेणीतील शिक्षकांच्या यादीत मोठ्या प्रमाणात विसंगती आहे. पात्र शिक्षकांना न्याय मिळत नसून अनेकांना अजूनही लाभापासून वंचित ठेवले जात आहे. तसेच रजा नियम, वेतनवाढ आणि सेवानिवृत्ती लाभांबाबतही अनेक तक्रारी प्रलंबित असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी काही प्रकरणांमध्ये नियमबाह्य आर्थिक वसुली झाल्याचा आरोप करत संबंधित प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. माहिती अधिकारांतर्गत मागविलेल्या माहितीलाही समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली. दरम्यान, आंदोलनादरम्यान सेवानिवृत्त शिक्षकांनी एकमुखाने ‘हम होंगे कामयाब’ हे गीत गात आपल्या एकजुटीचे प्रदर्शन केले. या गीताने संपूर्ण परिसर दणाणून गेला असून उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. लवकरात लवकर मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. 

प्रशासनाने भेटायला खाली यावे

आंदोलन दरम्यान प्रशासनाने सेवानिवृत्त शिक्षकांना चर्चेसाठी बोलाविले होते. मात्र आम्ही आंदोलनाची नोटीस आधीच दिली होती. परंतु त्यावर काही चर्चा झाली नाही. त्यामुळे आता प्रशासनाने खाली येऊन चर्चा करावी अशी ठाम मागणी शिक्षकांनी लावून धरली.