जिल्ह्यात दोन लाखांपेक्षा जास्त वृक्ष लागवड : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: September 08, 2025 20:03 PM
views 105  views

सिंधुदुर्गनगरी :  'हरित महाराष्ट्र - समृद्ध महाराष्ट्र'  या अभियानांतर्गत राज्यात  १० कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.  या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात २ लाखांपेक्षा अधिक वृक्ष लागवड करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत काही विभागांनी लक्षणीय कामगिरी केली असून उर्वरित विभाग देखील उद्दिष्टपूर्तीकडे टप्प्याटप्प्याने वाटचाल करत आहेत. जिल्ह्यातील सर्व नागरीकांनी 'एक पेड माँ के नाम 2.0' मोहिमे अंतर्गत जास्तीत जास्त वृक्ष लागवड करावी. तसेच लावण्यात आलेल्या रोपांची माहिती प्ले स्टोअरवर उपलब्ध असणाऱ्या अमृत वृक्ष ॲप मध्ये अपलोड करावी. राज्य शासनाचे हे महत्वाकांक्षी अभियान असून जिल्हा प्रशासन आणि नागरिकांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे ही मोहिम यशस्वी करण्यात येईल   असे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या.

'हरित महाराष्ट्र -समृद्ध महाराष्ट्र'  या अभियानांतर्गत १० कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा जिल्हास्तरीय आढावा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. विभागनिहाय उद्दिष्टे, प्रत्यक्ष लागवड आणि अमृत वृक्ष ॲपवरील नोंदींचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला. या वेळी उपवनसंरक्षक मिलिश शर्मा, अधीक्षक अभियंता पद्माकर पाटील, पत्तन अभियंता वीणा पुजारी, जिल्हा सह आयुक्त विनायक औंधकर, जिल्हा कृषी अधिक्षक भाग्यश्री नाईकनवरे, शिक्षणाधिकारी कविता शिंपी, प्रजापती शामराव थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी आदी उपस्थित होते.  

जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे म्हणाल्या की, जिल्ह्यातील विविध विभागांकडून आतापर्यंत दोन लाखापेक्षा जास्त रोपे लावण्यात आली आहेत. उर्वरित विभागांनी देखील प्राधान्याने उद्दिष्ट्य पूर्ती करावी. सर्व विभागांनी ३० सप्टेंबर २०२५ अखेरपर्यंत उद्दिष्ट पूर्ण करण्याचे व लागवड झालेल्या प्रत्येक रोपाची नोंद अमृत वृक्ष ॲपमध्ये करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी यावेळी दिले.