
सिंधुदुर्गनगरी | लवू म्हाडेश्वर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गणेशोत्सव हा फक्त धार्मिकच नाही तर परंपरा आणि संस्कृतीचा मिलाफ आहे. या परंपरा जपणाऱ्या घराण्यांमध्ये ओळीये (ता. मालवण) येथील घाडीगावकर घराण्याचा ४० कुटुंबांचा गणपती विशेष महत्त्वाचा ठरतो. तब्बल साडेतीनशे वर्षांचा अखंड वारसा असलेला हा गणपती आजही एकत्र कुटुंबपद्धतीचे जिवंत उदाहरण आहे.
ऐतिहासिक वारशाचा ठेवा
सिद्धगड किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेले हे घराणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आहे. येथे असलेले जुने घर आजही इतिहास सांगते. वाडा मोडकळीस आल्यावर तब्बल २० हजारांहून अधिक चिरे वापरून भव्य बांधकाम करण्यात आले आहे. या घरात प्रशस्त सभागृह, २१ खोल्या, जुने प्रसूतीगृह आणि अनेक ऐतिहासिक वस्तू आजही जतन करण्यात आलेल्या आहेत.
धार्मिक व सांस्कृतिक परंपरा
दरवर्षी ११ दिवस गणेशोत्सव भक्तिभावाने साजरा केला जातो. दहाव्या दिवशी होणाऱ्या जागर व तीर्थ परंपरेशिवाय गणेश विसर्जन होत नाही. त्यामुळे काहीवेळा विसर्जन ३७ दिवसांपर्यंत लांबते. गणरायाला "नवसाला पावणारा गणराज" म्हणून दशक्रोशीभर प्रसिद्धी आहे.
या घराण्याला भजन, दशावतार व नाट्यसंस्कृतीचा समृद्ध वारसा लाभला आहे. भजनीबुवा स्वर्गीय नामदेव घाडीगावकर हे प्रसिद्ध भजनी बुवा होते.तर आजचे दशावतारातील प्रसिद्ध हार्मोनियम वादक पप्पू घाडीगावकर यांनी या परंपरेला पुढे नेले आहे. भजन, नाटक, दशावतार यामुळे या गणेशोत्सवाचे स्वरूप धार्मिकासोबत सांस्कृतिकही आहे.
एकत्र कुटुंबपद्धतीचे जिवंत उदाहरण
४० कुटुंबे, सुमारे ३५० सदस्यांचे एकत्रित कुटुंब, ही आजच्या काळात दुर्मीळ गोष्ट. घरांची संख्या वाढली तरी मूळ घराशी नाळ तुटू नये याची खबरदारी या कुटुंबीयांनी घेतली आहे. म्हणूनच कुठल्याही नवीन घरात तुळशीवृंदावन किंवा देवघर नसून सर्वच कुटुंबीय मूळ घरातच सण-उत्सव साजरे करतात.
दररोज ३५० लोकांचे जेवण
गणेशोत्सव काळात मुंबई, पुणे, गोवा तसेच परदेशातूनही कुटुंबीय येथे दाखल होतात. या काळात दररोज ३५० लोकांचे जेवण एकत्र बसून बनवले व खाल्ले जाते. भक्तिभाव, एकोपा आणि आपुलकी यामुळे हा गणेशोत्सव अधिकच विशेष ठरतो. घाडीगावकरांचा हा गणपती म्हणजे इतिहास, परंपरा आणि एकत्र कुटुंबपद्धतीचा जिवंत वारसा. साडेतीनशे वर्षे चालत आलेली ही परंपरा सिंधुदुर्गातील आदर्श ठरत आहे.