
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामांना गती देऊन प्रशासन लोकाभिमुख पद्धतीने चालविण्याचा निर्धार नवनियुक्त जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांनी व्यक्त केला. शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जिल्ह्याचे सामाजिक, सांस्कृतिक व भौगोलिक वैशिष्ट्य लक्षात घेऊन विकास आराखडा तयार करण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्या म्हणाल्या. "प्रशासन आणि लोकसहभाग या दोन्हींचा समन्वय साधूनच जिल्ह्याच्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त करता येईल. पत्रकार हे समाजाचे डोळे व कान असून त्यांनी दाखवलेल्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहिले जाईल," असे आश्वासन त्यांनी दिले.
शेती, पर्यटन व आरोग्याला प्राधान्य
संवादादरम्यान जिल्हाधिकारी घोडमिसे यांनी सांगितले की, कोकणातील शेती उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, सिंचन प्रकल्पांना गती देणे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविणे हे महत्त्वाचे आहे. तसेच सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असल्याने पर्यटनवाढीबरोबरच पर्यावरण संवर्धनावरही भर दिला जाणार आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचा त्यांनी निर्धार व्यक्त केला.
जनतेच्या तक्रारींना प्राधान्य
जिल्ह्यातील विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याबरोबरच तक्रारींचे निराकरण ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे घोडमिसे यांनी नमूद केले. "जनतेशी थेट संवाद साधून समस्या जाणून घेण्यात येतील. प्रशासन पारदर्शक व लोकाभिमुख ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहीन," असे त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकारांशी सलोख्याचे संबंध
पत्रकारांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना उत्तर देताना घोडमिसे यांनी सांगितले की, पत्रकारांचे मुद्दे हेच प्रशासनासाठी दिशादर्शक ठरणार आहेत. "माहिती देताना व निर्णय घेताना पारदर्शकता ठेवू. संवादातूनच विश्वास वाढेल," असे त्या म्हणाल्या.