
सिंधुदुर्गनगरी : शासन जनतेसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवित असते. अशा शासकीय योजना तसेच उपक्रमांचा लाभ सामान्य जनतेला मिळवून देणे हे अधिकाऱ्यांचे काम आहे. काम करताना सोप्या पद्धतीने, पारदर्शकपणे आणि जनहिताच्या दृष्टीने निर्णय घ्यावेत. शासनाच्या १५० दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमाला सर्वांनी प्राधान्य द्यावे. तक्रारीला वाव न देता, नवनवीन उपक्रम राबविण्यास प्राधान्य द्यावे. सर्व अधिकाऱ्यांनी उत्कृष्ट काम करत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांच्या विभाग प्रमुखांशी संवाद साधला त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी शारदा पोवार, आरती देसाई, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले, जिल्हा कोषागार अधिकारी अमित मेश्राम, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
पुढे बोलताना श्रीमती धोडमिसे म्हणाल्या की, जिल्ह्याचा विकास करताना सर्वांनी मिळून काम करणे आवश्यक आहे. प्रशासनाने एकसंघ राहून काम केल्यास जिल्ह्यात सकारात्मक बदल घडवता येतो. नाविण्यपूर्ण योजना कशा प्रकारे राबविता येतील याचे सर्वांनी नियोजन करावे. नागरिकांचा विश्वास संपादन करणे हेच आपले मुख्य उद्दिष्ट असले पाहिजे. त्यांनी पुढे सांगितले की, “अधिकाऱ्यांनी फिल्डवर जाऊन काम करण्याला प्राधान्य द्यावे. जिल्हाधिकारी म्हणून मी देखील विविध गावांना प्रत्यक्ष भेटी देणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील खरी परिस्थिती जाणून घेऊन नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी तत्काळ सोडवता येतील.” शेवटी त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना आवाहन केले की, “जिल्ह्यातील शासकीय योजना प्रभावीपणे राबविण्यासोबतच प्रामाणिकपणे व पारदर्शकतेने काम करावे. एकत्रित प्रयत्नांतूनच जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधता येईल.”