
सिंधुदुर्ग : ज्येष्ठ समाजवादी नेते आणि कणकवली-मालवणचे भूतपूर्व आमदार डॉ.यशवंतराव बाबाजी दळवी तथा य. बा. यांचे रविवार १७ ऑगस्ट रोजी मुंबई मुक्कामी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांनी फेब्रुवारी महिन्यात शंभराव्या वर्षात पदार्पण केले होते. ‘आमचे डॉक्टर' या नावाने कणकवली तालुक्यामध्ये सुपरीचित असणारे य. बा.(१९६२) साली कणकवली व तद्नंतर मालवणमध्ये (१९७८) या मतदारसंघातून प्रजा समाजवादी पक्ष आणि जनता दलाच्या तिकिटावरून विधानसभेवर निवडून आले होते. ज्येष्ठ समाजवादी नेते, कोकणचे थोर सुपुत्र केंद्रिय बॅरिस्टर नाथ पै आणि दंडवते अर्थमंत्री आणि रेल्वे मंत्री प्राध्यापक मधु दंडवते यांचे ते विश्वासू सहकारी होते.
१९५३ साली वैद्यकीय परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी मुंबईत न राहता थेट आपले गाव कळसुली गाठले. अडलेली बाळंतीण आणि सर्पदंशाने बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी रात्रौ अपरात्री बॅग उचलून ४ ते ५ मैल ते जात असत. गावासाठी हायस्कूल आणि ओसरगांव - कळसुली तसेच कणकवली- हळवळ - शिरवल मार्ग रस्ते श्रमदान आणि भूदान या मार्गाने त्यांनी विकसित केले. त्यांच्या पश्चात पत्नी डॉ. श्रीमती साधना, सुपुत्र रणजीत (क्रीडा पत्रकार), मुलगी, नातवंडे-पतवंडे असा परिवार आहे.