
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण महिला बचत गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने ‘सिंधुदुर्ग सरस महोत्सव २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, २१ मार्च ते बुधवार, २५ मार्च २०२६ या कालावधीत कुडाळ येथील कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर हा महोत्सव रंगणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत आणि उपाध्यक्ष दादा साईल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ग्रामीण भागातील महिलांच्या कौशल्यांना व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या उत्पादनांची थेट विक्री व्हावी, हा या 'उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना'चा मुख्य उद्देश आहे. या महोत्सवात जिल्हाभरातील बचत गटांचे ७५ स्टॉल्स सहभागी होणार आहेत.
उत्पादने: काजू, आंबा, घरगुती मसाले, हातमाग उत्पादने आणि विविध ग्रामीण वस्तू. खाद्यजत्रा: अस्सल मालवणी आणि ग्रामीण खाद्यपदार्थांची मेजवानी. वेळ: सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत.
या प्रदर्शनाचे भव्य उद्घाटन खासदार नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमीसे, पोलीस अधीक्षक डॉ मोहन दहिकर, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर आणि विविध लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
पाच दिवसांचे भरगच्च कार्यक्रम
महोत्सवात केवळ खरेदीच नव्हे, तर प्रबोधन आणि मनोरंजनाचाही मेळ घालण्यात आला आहे:
२१ मार्च उद्घाटन, महिलांच्या विविध स्पर्धा आणि सायंकाळी समूह नृत्य.
२२ मार्च कृषी व पशुसंवर्धन शिबिरे आणि पारंपरिक खेळ.
२३ मार्च बँकिंग कार्यशाळा, महिला गट नृत्य स्पर्धा आणि रात्री दशावतार नाट्य.
२४ मार्च महिला-बाल विकास व आरोग्य विषयक कार्यक्रम आणि सांस्कृतिक सादरीकरण.
२५ मार्च बक्षीस वितरण, आढावा बैठक आणि महोत्सवाचा समारोप.
"जिल्ह्यातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या दर्जेदार उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि ग्रामीण संस्कृतीचा आनंद लुटण्यासाठी सिंधुदुर्गवासीयांनी या महोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे."
— प्रमोद कामत (अध्यक्ष, जि.प. सिंधुदुर्ग)
या पत्रकार परिषदेला जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब, उपजिल्हाध्यक्ष तुकाराम साईल, जि प सदस्य दीपलक्ष्मी पडते, जि प सदस्य रुपेश पावसकर, सभापती मिलिंद नाईक, उपसभापती सिताराम तेली, पंचायत समिती सदस्य अमित भोगले, पंचायत समिती सदस्य नागेश आईर, पंचायत समिती सदस्य निखिल कांदळगावकर तसेच विविध जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य आणि 'उमेद'चे प्रतिनिधी उपस्थित होते.










