
सिंधुदुर्गनगरी : भारत सरकारव्दारे मोबाईल चोरी / मोबाईल हरवणे याबाबतच्या तक्रारीबाबत मोबाईल ट्रेस करुन तो मोबाईल धारकांना परत मिळवून देण्याकरीता Central Equipment Identity Register (CEIR) हे ऑनलाईन पोर्टल विकसित केलेले आहे. सदर पोर्टलव्दारे ज्या व्यक्तींचे मोबाईल गहाळ होतात किंवा चोरीस जातात त्यांची तक्रार ऑनलाईन https://www.ceir.gov.in या पोर्टलवर नोंदविली जाते. तक्रार नोंदविल्यानंतर पोलीस विभागाकडून त्याबाबत तांत्रिक पध्दतीने मोबाईल ट्रेस केला जातो व संबंधित मोबाईल धारकांना योग्य त्या तजविजीने परत केला जातो.
भारत सरकाच्या CEIR या पोर्टलबाबत सिंधुदुर्ग पोलीस दलाकडून सोशल मिडीया, तसेच इतर माध्यमांव्दारे जनजागृती करुन मोबाईल हरविल्यास, गहाळ झाल्यास अथवा चोरीस गेल्यास ऑनलाईन तक्रार नोंदविणेबाबत जनजागृती करण्यात आलेली होती.
आतापर्यंत Central Equipment Identity Register या पोर्टलवर सन 2019 पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात 1090 तक्रारी प्राप्त झालेल्या असून पैकी 48,75,000 (अठेचाळीस लाख पंचाहत्तर हजार रुपये) किंमतीचे 325 मोबाईल तक्रारदार यांना परत करण्यात आलेले आहेत. उर्वरित प्राप्त चोरी / गहाळ / हरविलेल्या मोबाईलचा शोध घेणेसाठी श्री. मोहन दहिकर पोलीस अधीक्षक, यांचे मार्गदर्शनाखाली निसर्ग ओतारी, पोलीस निरीक्षक, सुरज पाटील पोलीस उपनिरिक्षक सायबर पोलीस ठाणे यांच्या नेतृत्वात सायबर पोलीस ठाणे स्तरावर व पोलीस ठाणे स्तरावर विशेष पथके तयार करण्यात आलेली होती. सदर पथकामार्फत दिनांक 16/05/2025 ते 31/05/2025 कालावधीमध्ये मोबाईल ट्रेस व रिकव्हर करणेकरिता विशेष मोहिम राबविण्यात आली होती. सायबर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक व पोलीस अंमलदार यांनी तांत्रिक तपास करुन प्राप्त तक्रारीपैकी 54 मोबाईल विशेष प्रयत्न करुन ट्रेस करण्यात यश आलेले आहेत. ट्रेस करण्यात आलेल्या मोबाईल पैकी 8,40,000/- रुपये (आठ लाख चाळीस हजार) किंमतीचे 54 मोबाईल हे दिल्ली, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, हैदराबाद, केरळ वगैरे राज्यातून तसेच महाराष्ट्रातील मुंबई, रत्नागिरी, पालघर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमधून सिंधुदुर्ग पोलीसांनी रिकव्हर करुन परत आणलेले आहेत.
हे रिकव्हर मोबाईल मोबाईल धारकांना परत करण्यासाठी मोहन दहिकर, पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांचे संकल्पनेतून दि. 05/06/2025 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय सिंधुदुर्ग येथे कार्यक्रम घेवून मोबाईल धारकांना त्यांचे मोबाईल परत करण्यात आले.
मोबाईल धारकांना त्यांचे मोबाईल परत मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त करुन सिंधुदुर्ग पोलीस दलाचे, तसेच पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, यांचे आभार मानले.
पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, यांनी नागरीकांचे मोबाईल गहाळ झाल्यास / हरविल्यास / चोरीस गेल्यास त्यांनी https://www.ceir.gov.in या बेवसाईटव्दारे Central Equipment Identity Register या पोर्टलवर ऑनलाईन तक्रार नोंदविणेबाबत नागरीकांना आवाहन केलेले आहे.