
सावंतवाडी : ३१ ऑगस्ट रोजी भटके विमुक्ती दिन सिंधुदुर्ग नारूर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी इकोनेट संस्था पुणे, सिंधुदुर्ग प्रतिनिधी फिजा मकानदार, जयराम जाधव आदि उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रमुख आकर्षणांपैकी एक म्हणजे महिलांसाठी घेतलेले विशेष आरोग्य मार्गदर्शन सत्र ठरले.
यावेळी फिजा मकानदार यांनी महिलांना आरोग्यविषयक सविस्तर माहिती देऊन त्यांच्यात आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण केली. योग्य आहार, स्वच्छतेचे महत्त्व, मातृ आरोग्य, मासिक पाळी दरम्यान घ्यायची काळजी तसेच दैनंदिन जीवनशैलीत करावयाच्या बदलांविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच समाजातील महिलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करताना, “सशक्त समाजासाठी प्रथम महिलांचे आरोग्य सक्षम असणे आवश्यक आहे”, असा संदेश फिजा मकानदार यांनी दिला. महिलांनी या सत्राला उत्तम प्रतिसाद दिला. यावेळी समाजातील महिलांना मोफत सॅनेटरी पॅडचे वाटप करून स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. या उपक्रमाबद्दल समाजातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, अशा आरोग्यविषयक जनजागृती कार्यक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नारूळ ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.