
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्यावतीने कुडाळ येथे महावितरणचे अधीक्षक अभियंता अरविंद वनमोरे यांची भेट घेण्यात आली. यावेळी पावसाळा जवळ येत असल्याने वीज वाहिन्यांवरील झाडी साफसफाई करून पावसाळ्यात अखंडित वीज पुरवठा करावा आणि वीज ग्राहकांना नव्याने दिलेली सुरक्षा ठेव अनामत रक्कम, आदी सह जिल्ह्यातील प्रलंबित असलेल्या इतर समस्यांकडे अधीक्षक अभियंता यांचे लक्ष वेधण्यात आले.
यावेळी जिल्हा वीज ग्राहक संघटना प्रभारी अध्यक्ष संजय लाड, जिल्हा समन्वयक ॲड. नंदन वेंगुर्लेकर, जिल्हा उपाध्यक्ष बाळ बोर्डेकर, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष संजय गावडे, व्यापारी महासंघाचे संजय भोगटे आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कार्य.अभियंता सुनील नलावडे देखील उपस्थित होते.
जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या वतीने यापूर्वी अधीक्षक अभियंता यांची भेट घेऊन जिल्ह्यातील समस्या त्यांच्याकडे मांडल्या होता. त्यावेळी आरोस गावासाठी रस्त्याच्या बाजूने वीज वाहिन्या टाकणे, आंब्रड येथील वीज प्रश्न, ओटवणे येथील वीज समस्या या मार्गी लागण्याच्या वाटेवर आहेत. परंतु निरवडे सबस्टेशन सारखे प्रश्न आजही सुटले नसल्याने मळगाव, तळवडे आदी गावांमध्ये वीज समस्या मोठ्या प्रमाणात आहेत. इन्सुली येथे सबस्टेशन असूनही कमी दाबाने होणारा वीज पुरवठा असे अनेक प्रश्न जिल्ह्यातही उभे राहिलेले आहेत. जिल्ह्याचे वीज वितरण इन्फ्रास्ट्रक्टर कमकुवत असल्याने या समस्या निर्माण होत आहेत. ज्याप्रमाणे वीज वसुली, डबल टिबल अनामत रक्कम घेण्यासाठी नेटवर्क वापरता त्याप्रमाणे समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील रहा आणि जिल्ह्यातील वीज ग्राहकांना चांगल्या सुविधा द्या अशी मागणी वीज ग्राहक संघटनेच्या वतीने अधीक्षक अभियंता यांच्याकडे करण्यात आली.
यावेळी जिल्ह्यातील वीज ग्राहकांना पुन्हा एकदा देण्यात असलेली ज्यादा अनामत रक्कमची बिले यावर देखील विचार व्हावा आणि पुन्हा पुन्हा अनामत रक्कम ग्राहकांकडून मागणी करू नये, जिल्ह्यात मंजूर झालेली नवीन वीज वाहिन्या टाकणे, विद्युत पोल बदलणे आदी कामे लवकरात लवकर करण्यात यावीत, ठेकेदारांनी जिथे ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी खांब उभे करून ठेवलेत तिथे तात्काळ ट्रान्सफॉर्मर बसविणे, पावसाळ्यापूर्वी वीज वाहिन्यांवर आलेली झाडी तोडून पावसाळ्यात वीज ग्राहकांना होणारा त्रास आणि महावितरणचे होणारे नुकसान टाळावे, नोटीस न देता वीज कनेक्शन तोडू नयेत, ट्रान्सफॉर्मरच्या बाजूने सुरक्षा कुंपण करणे, अशा सूचना देण्यात आल्या.
यावेळी इर्शाद शेख, तुकाराम म्हापसेकर, कुडाळ तालुकाध्यक्ष गोविंद सावंत, प्रशांत राधाकृष्ण पेडणेकर, नारायण पेडणेकर, श्यामसुंदर राय, योगेश तांडेल आदी वीज ग्राहक संघटना जिल्हा व तालुका संघटना पदाधिकारी उपस्थित होते.