
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दरवर्षी दिला जाणारा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार यंदा जिल्ह्यातील आठ शिक्षकांना जाहीर करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी गणपती कमळकर उपस्थित होते. यंदा जिल्ह्यातील आठ तालुक्यांतून एकूण 21 प्रस्ताव उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारासाठी आले होते. प्राप्त प्रस्तावांची दोन टप्प्यात काटेकोर मुलाखत घेऊन शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांसाठी राबवलेले उपक्रम, शाळांमध्ये निर्माण केलेले शैक्षणिक वातावरण अशा विविध बाबींचा विचार करून अंतिम निवड करण्यात आली. विभागीय कोकण आयुक्तांकडून मंजुरी मिळाल्यानंतर आज अधिकृत घोषणा करण्यात आली.
सीईओ रवींद्र खेबुडकर यांनी सांगितले की, “सिंधुदुर्ग जिल्हा परिषद उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांचा दरवर्षी गौरव करते. यंदाही सर्व प्रस्तावित शिक्षकांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यातूनच स्पर्धात्मक वातावरण निर्माण झाले होते. अंतिम आठ शिक्षकांची निवड करणे हे खूप कठीण काम होते.”
लवकरच विशेष कार्यक्रम आयोजित करून या सर्व शिक्षकांना पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांची यादी :
कणकवली : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्र. १ चे पदवीधर शिक्षक विनायक शंकर जाधव
सावंतवाडी : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा मांडखोल क्र. १ चे पदवीधर शिक्षक विलास रामचंद्र फाले
दोडामार्ग : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाळयेचे उपशिक्षक उदय विठ्ठल गवस
वेंगुर्ला : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा मठ कणकेवाडी क्र. ३ चे उपशिक्षक रामा वासुदेव पोळजी
कुडाळ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय, माणगाव येथील उपशिक्षक बाबाजी सुरेश भोई
देवगड : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गिर्ये क्र. १ चे उपशिक्षक संजय शामराव पाटील
वैभववाडी : पीएम श्री दत्त विद्या मंदिर, वैभववाडी येथील उपशिक्षक दिनकर शंकर केळकर
मालवण : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेरी मळाचे उपशिक्षक चंद्रकांत गणपती कदम