
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा हा कुपोषण मुक्त असावा या सामाजिक बांधिलकीतून जिल्हा बँकेने कुपोषित मुलांच्या समस्या जाणून घेत त्यांची आरोग्य तपासणी तसेच त्यांना प्रोटीनयुक्त आहार देण्याच्या दृष्टीने जिल्हा बँकेने सकारात्मक पाऊले उचलली असून या उपक्रमातून सिंधुदुर्ग जिल्हा कुपोषणमुक्त होईल असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी साहेब यांनी केले.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयात 'बलसिंधु दत्तक योजने अंतर्गत' समाविष्ट झालेल्या कुपोषित मुलांचे पालक, आशा सेविका, बँक सखी तसेच त्यांना मदत करणारे जिल्हा बँकेचे कर्मचारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. ही योजना यशस्वी करण्याच्या अनुषंगाने विविध विषयांवर विस्तृत चर्चा करण्यात आली.
या बैठकीस जिल्हा बँकेचे संचालक सर्वश्री विठ्ठल देसाई, प्रकाश बोडस, दिलीप रावराणे, विद्याधर परब, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, बँकेचे अधिकारी, बलसिंधु दत्तक योजनेतील सहभागी मुलांचे पालक तसेच अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.