सिंधुदुर्ग बँकेचा व्यवसाय ७१७६ कोटींवर

जिल्ह्याच्या विकासाला आर्थिक पाठबळ
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: April 03, 2026 15:17 PM
views 628  views

सिंधुदुर्गवासियांच्या विश्वासावर गरुड भरारी : अध्यक्ष मनीष दळवी

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेने ३८ वर्षांत ४२०० कोटींचा व्यवसाय गाठल्यानंतर, विद्यमान संचालक मंडळाने अवघ्या ४ वर्षांत ३००० कोटींची भर घालत ३१ मार्चअखेर एकूण व्यवसाय ७१७६ कोटींवर नेला. शेतकरी, उद्योजक, सभासद व ग्राहकांच्या विश्वासावर उभी राहिलेली बँक खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतीच्या शिखरावर झेपावली आहे! पुढील दोन वर्षात दहा हजार कोटी चा टप्पा पूर्ण करण्याचा व ग्राहकांना दर्जेदार घरपोच बँकिंग सेवा देण्याचा  संकल्प असल्याचे सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी गुरुवारी झालेल्या खास पत्रकार परिषदेत सांगितले.

बँकेच्या या ऐतिहासिक वाटचालीबाबत माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद झाली. यावेळी मनीष दळवी बोलत होते, यावेळी मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, प्रभारी नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी दिवाकर देसाई, संचालक रवींद्र मडगावकर, समीर सावंत व बँकेचे अधिकारी उपस्थित होते. 

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आपल्या चार दशकांहून अधिक कालावधीच्या वाटचालीत सातत्यपूर्ण प्रगती साधत आज भक्कम आर्थिक पाया उभा केला आहे. ग्रामीण व शहरी भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, उद्योजक आणि महिलांच्या आर्थिक गरजा पूर्ण करत बँकेने जिल्ह्याच्या अर्थकारणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. विशेष म्हणजे, गेल्या चार वर्षांत बँकेने विक्रमी वाढ नोंदवत एकूण व्यवसाय ७१७६ कोटींवर नेला आहे. ग्राहकांचा विश्वास वाढवून जिल्ह्याच्या ग्रामीण विकासाला बळकटीत दिली आहे. बँकेचा व्यवसाय वाढविताना ठेवीदारांमध्ये विश्वास, कर्जदारांकडून वसुली, नफ्याचे वाढणारे प्रमाण याकडे विशेष लक्ष दिले आहे. नाबार्ड व सहकार विभागाच्या अनेक धोरणामध्ये सिंधुदुर्ग बँक राज्यात अव्वल स्थानी आहे. ऑडिट अ दर्जा या बँकेने सातत्याने राखला आहे. घरपोच बँकिंग सेवेची दखल नाबार्डने घेतली असून देशभर ते एक मॉडेल ठरू पाहत आहे. यात संचालक मंडळ बँकेचे अधिकारी कर्मचारी व मार्गदर्शन करणारा सहकार विभाग नाबार्ड या सर्वांचेच मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे! असेही मनीष दळवी यांनी स्पष्ट केले. 

दि. १३ जानेवारी २०१२ रोजी विद्यमान संचालक मंडळाने पदभार स्वीकारल्यानंतर आपल्या नेतृत्वाखाली बँकेने धोरणात्मक निर्णय, सुयोग्य नियोजन आणि पारदर्शक कारभार यांद्वारे उल्लेखनीय प्रगती साधली. बदलत्या आर्थिक परिस्थितीशी सुसंगत राहून आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करत ग्राहकाभिमुख सेवा देण्यावर भर देण्यात आला.एकूण व्यवसाय: ४२००.६८ कोटींवरून ७१७६ कोटी,  ठेवी: २०६३.३० कोटींवरून ३१४२.१० कोटी, कर्जवाटप: २०१४.२ कोटींवरून २३६४ कोटी, निव्वळ नफा: १६ कोटींवरून ५० कोटी, या चार वर्षांत बँकेच्या सर्व आर्थिक घटकांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. व्यवसायात दुप्पटपेक्षा अधिक वाढ नोंदवली गेली आहे. बँकेला सातत्याने ‘अ’ दर्जा प्राप्त होत असल्याने तिची आर्थिक स्थिती अधिक सक्षम आणि विश्वासार्ह ठरली आहे.

शेतकरी व ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा आधारदिला आहे. जिल्ह्यातील शेतकरी वर्गासाठी बँक ही विश्वासार्ह आर्थिक आधारस्तंभ ठरली आहे. शेती विकास, पशुपालन, कुक्कुटपालन, मत्स्यव्यवसाय यांसारख्या पारंपरिक उद्योगांना चालना देण्यासाठी सुलभ कर्ज योजना राबविण्यात आल्या आहेत. तसेच नैसर्गिक आपत्ती, पीक नुकसान अशा संकटांच्या काळातही बँकेने शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे.

युवक, उद्योजक आणि महिलांसाठी विशेष उपक्रम

नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उद्योग कर्ज योजना प्रभावीपणे राबविण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागातील लघुउद्योगांना चालना देत रोजगारनिर्मितीला हातभार लावण्यात बँक यशस्वी ठरली आहे.महिला सक्षमीकरणासाठी ‘बँक सखी’ योजना राबवून महिलांना गावपातळीवर बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामुळे महिलांचा आर्थिक व्यवहारात सहभाग वाढत असून, आर्थिक साक्षरतेलाही चालना मिळत आहे.

डिजिटल बँकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे.  आधुनिक काळाची गरज ओळखून बँकेने डिजिटल बँकिंग सेवांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. ९८ शाखा ४१ एटीएम केंद्रे यांच्या माध्यमातून ग्राहकांना जलद, सुरक्षित आणि सुलभ सेवा देण्यात येत आहे. मोबाईल बँकिंग, ऑनलाईन व्यवहार यांसारख्या सुविधा ग्रामीण भागातही पोहोचविण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला आहे.संगणकीकरणात राज्यात प्रथम क्रमांक

प्राथमिक विकास सेवा संस्थांच्या बळकटीकरणासाठी बँकेने संगणकीकरण प्रकल्प प्रभावीपणे राबवला. व्यवस्थापन खर्चासाठी अनुदान, वसुलीनुसार प्रोत्साहन आणि संगणकीकरण पूर्ण करणाऱ्या संस्थांना आर्थिक मदत देण्यात आली. याच प्रयत्नांमुळे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने संपूर्ण महाराष्ट्रात संगणकीकरणात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या उपक्रमामुळे संस्थांची कार्यक्षमता, पारदर्शकता आणि सेवा गुणवत्ता मोठ्या प्रमाणात सुधारली आहे.

 ग्राहकांचा वाढता विश्वास, पारदर्शक कारभार, प्रभावी नियोजन आणि सामाजिक बांधिलकी यांमुळे बँकेने आर्थिक प्रगतीसोबत विश्वासार्हतेची भक्कम प्रतिमा निर्माण केली आहे.

बँकेच्या या यशामागे सभासद, ठेवीदार, कर्जदार, ग्राहक, संचालक मंडळ आणि अधिकारी-कर्मचारी यांचे मोलाचे योगदान असल्याचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी नमूद केले. भविष्यातही ही प्रगती कायम ठेवत अधिक व्यापक सेवा देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

एकूणच, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही केवळ आर्थिक संस्था नसून, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाची भागीदार ठरत आहे. आकडेवारीतील वाढ ही केवळ आर्थिक यश नसून, विश्वास, पारदर्शकता आणि दूरदृष्टीचा परिणाम असल्याचे या प्रगतीतून अधोरेखित झाले आहे असेही मनीष दळवी यांनी यानिमित्ताने सांगितले.