
सिंधुदुर्गनगरी : तब्बल चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सिंधुदुर्ग जिल्हा परिषद पुन्हा एकदा राजकीय व प्रशासकीय हालचालींच्या केंद्रस्थानी येत असून, नव्या पदाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पहिली सर्वसाधारण सभा येत्या १५ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात होणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या अध्यक्षतेखाली होणारी ही पहिलीच सभा असल्याने तिचे विशेष महत्त्व अधोरेखित झाले आहे. २५ मार्च रोजी विषय समिती सभापतींची निवड प्रक्रिया पार पडताच प्रशासनाने गती घेतली आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या सभेत विषय समिती सभापतींना खातेवाटप करण्यात येणार असून, विविध समित्यांवरील सदस्यांचीही निवड केली जाणार आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षपदी प्रमोद कामत तर उपाध्यक्षपदी दादा साईल यांची निवड झाल्यानंतर संतोष साटविलकर, प्रितेश राऊळ, अनुराधा नारकर आणि रुहिता तांबे यांच्याकडे विविध विषय समित्यांची धुरा सोपविण्यात आली आहे. आता या सर्व पदाधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रानुसार अधिकृत जबाबदाऱ्या देण्याची प्रक्रिया या सभेत पूर्ण होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, उपाध्यक्ष दादा साईल यांच्याकडे कृषी व पशुसंवर्धन खाते, संतोष साटविलकर यांच्याकडे वित्त व बांधकाम, तर प्रितेश राऊळ यांच्याकडे शिक्षण व आरोग्य ही महत्त्वाची खाती सोपविण्याची शक्यता आहे. महिला व बालविकास समितीच्या सभापती अनुराधा नारकर आणि समाजकल्याण समितीच्या सभापती रुहिता तांबे यांच्या कार्यालाही या सभेनंतर अधिकृत वेग मिळणार आहे. दरम्यान, स्थायी समिती आणि जलव्यवस्थापन ही प्रमुख खाती परंपरेप्रमाणे अध्यक्षांकडेच राहणार आहेत. नव्याने निवडून आलेल्या सर्व सभापतींच्या सहभागाने होणारी ही पहिलीच सर्वसाधारण सभा असल्याने, पुढील कार्यकाळाचा रोडमॅप याच बैठकीत निश्चित होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील विकासकामे, प्रलंबित प्रश्न आणि विविध धोरणात्मक विषयांवर सखोल चर्चा अपेक्षित असून, प्रशासनाला नवी गती देणारी ही सभा ठरणार असल्याचे संकेत आहेत. परिणामी, या महत्त्वपूर्ण बैठकीकडे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.










