
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा बँकेने KFW संस्था जर्मनी व नाबार्ड यांच्या अर्थसाहाय्यातून नैसर्गिक साधन संपत्ती व्यवस्थापन प्रकल्प (युपीएनआरएम) राबविला होता. प्रकल्प एकूण रू.५००.६० लाखचा होता. यामध्ये दुधाळ जनावरे, बायोगॅस, सुरण व केळी लागवड, शौचालय बायोगॅस जोडणी, कुक्कुटपालन व्यवसाय यांचा समावेश होता. प्रकल्पामध्ये नाबार्ड, जिल्हा बँक व भगीरथ प्रतिष्ठान याचा सहभाग होता. बँकेने सदर प्रकल्प मुदतीत पूर्ण केला आहे.
युपीएनआरएम प्रकल्पामुळे झालेल्या सकारात्मक परिणामांचा अभ्यास करणेसाठी जर्मनमधून KFW या संस्थेच्या मॅनेजर श्रीम. थेरेसा व नाबार्ड चे डी जी एम श्री. हेमंत कुंभारे यांनी दि.१६/०६/२०२५ रोजी बँकेस भेट दिली. यावेळी निवजे गावातील लाभार्थी शेतकऱ्यांशी संवाद साधला व या प्रकल्पात सहभागी झाल्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांना झालेला फायदा त्यांच्या उत्पन्न स्त्रोत, जीवनमानात झालेला बदल इ. बाबत माहिती घेतली. तसेच लाभार्थी शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष गोठ्यात जावून दुभती जनावरे, बायोगॅस, गांडूळ खत प्रकल्प इ. प्रत्यक्ष पाहणी केली. तद्नंतर भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान, झाराप कार्यालयास भेट देवून प्रकल्पाबाबत माहिती घेतली. त्यानंतर जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयास भेट देवून लाभार्थी शेतकऱ्यांना केलेल्या कर्जवाटपाची माहिती घेतली. सदर प्रकल्पामुळे झालेला सामाजिक, आर्थिक बदल तसेच बँकेच्या सर्वसामान्य ग्राहकांची झालेली वाढ याची माहिती घेवून समाधान व्यक्त केले.
KFW या संस्थेच्या मॅनेजर श्रीम. थेरेसा यांनी जिल्हा बँक व भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान झाराप यांनी प्रकल्प चांगल्या प्रकारे राबविला म्हणून विशेष अभिनंदन केले. यावेळी जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रमोद गावडे व भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. श्री. प्रसाद देवधर, निवजे गावचे सरपंच, निवजे दुग्ध संस्थेचे अध्यक्ष व निवजे गावचे लाभार्थी शेतकरी उपस्थित होते.