
कुडाळ : लायन्स क्लब ऑफ कुडाळ, सिंधुदुर्ग या सेवाभावी संस्थेतर्फे आयोजित सिंधु लायन्स ऑटो-एक्सपो इंडस्ट्रियल-कम-फूड फेस्टिवल या महोत्सवाचा उदघाटन सोहळा गुरुवार दि. २९ डिसेंबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर होणार आहे. शनिवार दि. ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत तीन दिवस चालणा-या महोत्सवाची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या रेलचेलसह खाद्यपदार्थांची मेजवानी असणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हावासियांनी या महोत्सवाला आवर्जून भेट देत आनंद द्विगुणित करावा असे आवाहन लायन्स सेवा संकुलचे अध्यक्ष अॅड.अमोल सामंत, लायन्स क्लब अध्यक्ष अॅड.समीर कुलकर्णी, महोत्सव समिती अध्यक्ष चंद्रशेखर पुनाळेकर व सीए.सागर तेली यांनी केले आहे.
लायन्स क्लब ऑफ कुडाळ सिंधुदुर्गच्या वतीने कुडाळ हायस्कूल, कुडाळच्या मैदानावर सिंधु लायन्स ऑटो-एक्सपो इंडस्ट्रियल-कम-फूड फेस्टिवल या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तीनही दिवस रोज सायं.६ वाजता या महोत्सवाला सुरुवात होणार आहे.
सिंधुदुर्गसह पुणे,मुंबई, कोल्हापूर, सांगली, सातारा येथील इंडस्ट्रियल, ऑटो एक्सपो, खाद्यपदार्थ व जनरल स्टॉल्स आदी मिळून 87 स्टॉल या महोत्सवात सहभागी झाले आहेत. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच भव्य रक्कमेच्या राज्यस्तरीय हास्यकल्लोळ विनोदी स्किट स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात एका छताखाली सर्व ऑटोकंपन्यांच्या गाड्यांचे स्टॉल्स व गाड्यांचे मॉडेल्स उपलब्ध असणार आहेत. या सोबत बँकेद्वारे लोन मेळावा, त्वरित कर्ज व कार एक्सेज सुविधांचे स्टॉलचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यावासीयांना आपली कार खरेदी एक्सचेंज करण्याची संधी या महोत्सवात मिळणार आहे. याबरोबरच महोत्सवामध्ये इंडस्ट्रियल व जनरल स्टॉल्स साठी राज्यभरातून विविध प्रकारचे ( हर्बल, आयुर्वेदिक, कॉसमेटिक प्रोडक्ट्स, शेती-घरगुती यंत्र इ.) स्टॉल्स अनुभवण्यास मिळणार आहेत. या सर्वांसोबतच खवय्यांसाठी मेजवानी म्हणून विविध प्रकारच्या खाद्यपदार्थाच्या स्टॉल्सचे देखील उपलब्ध असतील. फूड- स्टॉल्समध्ये विशेष आकर्षणाचे रुचकर चविष्ट पदार्थ, मराठमोळ्या संस्कृतीने भरलेल्या चवदार पदार्थांचा आस्वाद घेण्यास मिळणार आहेत.
गुरूवार दिनांक २९ रोजी या सिंधू लायन्स फेस्टिव्हलचे उद्घाटन लायन्स डिस्ट्रिक्ट 3234 D1 चे प्रांतपाल एम के एफ लायन राजशेखर कापसे यांच्या हस्ते व सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, सारस्वत बँकेचे संचालक सीए. सुनील सौदागर, नगराध्यक्षा सौ.आफरीन करोल यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. उद्घाटनाच्या अगोदर कथक विशारद नृत्यांगना मृणाल सावंत हिचे गणेश वंदना होणार आहे. त्यानंतर हास्यकल्लोळ राज्यस्तरीय विनोदी स्किट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सोबत लायन्स गीत नजराणा हा नावाजलेल्या गाण्यांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवार ३० रोजी भारतातील शास्त्रीय, लोक नृत्या सोबत पश्चिमी नृत्य कलेचा आविष्कार कार्यक्रम सादर होईल तसेच नृत्यासोबत संगीत-गाण्यांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. शनिवार ३१ रोजी पुणे येथील प्रसिद्ध सिनेतारका लावणीसम्राज्ञी अर्चना सावंत व त्यांच्या टीमचा विविध प्रकारच्या गाण्यांचा कार्यक्रम जल्लोषात होणार आहे. रात्री सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे. या महोत्सवात दिव्यांग पुजा धुरी हिच्या पेंटींग चित्रांचा स्टॉल्स असणार आहे. या लायन्स महोत्सवासाठी सारस्वत बँक व सिंधु बँकचे नैतिक व मोलाचे सहकार्य मिळाले आहे. जिल्हावासियांनी या महोत्सवाला उपस्थित राहावे असे आवाहन लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.