
राजापूर : सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या कोकण कोकणपट्ट्यात राजापूर-लांजा येथील जंगल परिसरातील विशेषतः ब्लॅक पँथर, शेकरूच्या वास्तव्याने वन्यजीव अभ्यासकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
गेल्या पंधरा वर्षांमध्ये राजापूर तालुक्यामध्ये ओणी व कुवेशी या ठीकाणी दोनवेळा आढळलेला जिवंत ब्लॅक पँथर आणि लगतच्या लांजा तालुक्यामध्ये आढळलेला शेकरू हा दुर्मीळ राज्यप्राणी. पश्चिम घाटातील वनसंपदेचा वारसा लाभलेल्या आणि सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या राजापूर-लांजा परिसराच्या जंगल परिसरामध्ये विविध दुर्मीळ प्राण्यांचा वावर असल्याचे अधोरेखित झाले आहे. राजापूर-लांजा येथील जंगल परिसरातील विशेषतः ब्लॅक पँथर, शेकरूच्या वास्तव्याने वन्यजीव अभ्यासकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ब्लॅक पँथर, शेकरूच्या सुरक्षित अधिवासासाठी येथील जंगल परिसर आणि वातावरण पोषक असणार हे निश्चितच. त्यामुळे ब्लॅक पँथर, शेकरू या दुर्मीळ प्रजातीसह येथील वनसंपदेची सुरक्षितता जतन अन् संवर्धन यादृष्टीने महत्त्व वाढले आहे. वनविभागाने राजापूर-लांजाच्या जंगलराजीवर 'स्पशेल वॉच' ठेवला आहे.
"दृष्टिक्षेपात ब्लॅक पँथर"
बिबट्या हा मांजर कुळातील प्राणी. दोघांमध्ये फरक आहे. बिबट्याच्या अंगावर पोकळ ठिपके आढळतात आणि शरीरयष्टी मांजराप्रमाणे भरीव असते. बिबट्याचे भारतीय बिबट्या, श्रीलंकी बिबट्या, आफ्रिकी बिबट्या, उत्तर चिनी बिबट्या, चिनी भारतीय बिबट्या, अरबी बिबट्या, अमूर बिबट्या, कॉफेशियाई बिबट्या अशा उपप्रजाती अस्तित्वात आहेत. काळा बिबट्या ही बिबट्याची वेगळी जात नसून कालिकण (मेलॅनीन) हे त्वचेतील रंगद्रव्य (पिगमेंट) जास्त प्रमाणात तयार झाल्यामुळे हे बिबटे काळे दिसतात. पांढऱ्या वाघाचा पांढरा रंग कालिकणाच्या अभावामुळे असतो. काळे बिबटे हे दाट जंगलांमधे जास्त दिसत असून त्यांना काळ्या रंगाचा अधिक फायदा होतो असे मानले जाते. या रंगबदलामुळे प्राण्याच्या वर्तणुकीत किंवा स्वभावात काही फरक न पडता ते त्यांच्या कुळातील प्राण्यांप्रमाणेच वागतात. चीन, म्यानमार, जावा, उत्तर मलेशिया, नेपाळ या देशांसह भारतात आसाम, मध्य भारत, दक्षिण भारतात काळे बिबटे आढळतात.
"दृष्टिक्षेपात शेकरू"
शेकरू ही खारींची एक प्रजाती असून महाराष्ट्र राज्याचा राज्यपशू आहे. त्याचे वजन दोन ते अडीच किलो व लांबी अडीच ते तीन फूट असते. त्याला गुंजेसारखे लालभडक डोळे, मिशा, अंगभर तपकिरी तलम कोट आणि गळ्यावर, पोटावर पिवळसर पट्टा, झुबकेदार लांबलचक शेपूट असते. शेकरू हा अतिशय देखणा आणि झपाट्याने दुर्मीळ होणाऱ्या प्रजातीतील प्राणी आहे. शेकरूची मादी वर्षातून एकदाच डिसेंबर-जानेवारीत पिलाला जन्म देते. एक शेकरू सहा ते आठ घरे तयार करतो. एका झाडावरून दुसऱ्या झाडावर सहज झेप घेताना १५ ते २० फूट लांब उडी मारू शकतो. शेकरू डहाळ्या व पाने वापरून गोलाकार आकाराचे घरटे बनवते. सुरक्षेसाठी हे घरटे बारीक फांद्यांवर बांधले जाते. भीमाशंकर, फणसाड, आंबा घाटाजवळील जंगलात, आजोबा डोंगररांगात, माहुली व वासोटा परिसरात शेकरू आढळतो. शेकरूची भीमाशंकरच्या जंगलात आढळणारी भीमाशंकरी ही राज्यातील इतर शेकरूपेक्षा वेगळी जात आहे. भीमाशंकर, मध्य प्रदेश या भागात आढळणारे शेकरू आणि सह्याद्रीतील शेकरू यात थोडाफार फरक असतो.
"बिबट्या जैवविविधततेच्या साखळीतील दुवा"
डोंगर पायथ्याशेजारी मोठ्याप्रमाणात क्षेत्र आहे. वन्यप्राण्यांकडून ज्या प्रमाणात शेतीचे नुकसान होते. उंदीर, रानडुक्कर, पक्षी, रानगवे, सांबर यांच्याकडूनही शेतीचे नुकसान होते. माकडेही शेती अन् बागायतीसाठी हानीकारक ठरत आहेत. बिबट्या शेतीसाठी नुकसानकारक ठरणाऱ्या अशा अनेक उभयचर प्राण्यांनाही भक्ष्य करीत असतो. यामुळे शेतीचेही अनपेक्षितपणे रक्षण होते. त्यातून, जैवविविधततेच्या साखळीत बिबट्या हा महत्त्वाचा दुवा ठरत आहे. त्यांची संख्या घटल्यास अन्नसाखळीत अडचणी येईल. त्यामुळे बिबट्याचेही संरक्षण आणि संवर्धन होणे गरजेचे आहे.
"ब्लॅक पँथर, शेकरूचा वावर"
जैवविविधततेने नटलेल्या पश्चिम घाटासह सह्याद्रीच्या पर्वतरांगातील जंगलामध्ये वावरणारे विविध वन्यप्राणी गेल्या काही वर्षांमध्ये कोकणात दिसू लागले आहेत. त्यामध्ये दुर्मीळ ब्लॅक पँथर डिसेंबर, २०१३ मध्ये राजापुरातील ओणी येथे विहिरीमध्ये पडलेला आढळला होता. दोन महिन्यांपूर्वी कुवेशी येथे फासकीमध्ये अडकल्याची घटना घडली होती. या दोन्ही ठिकाणी वनविभागाला ब्लॅक पँथरची सुखरूपपणे सुटका करण्यात यश आले आहे. मात्र, त्यातून राजापूरमध्ये ब्लॅक पँथरचे वास्तव्य असल्याचे स्पष्ट होते. दोन महिन्यांपूर्वी भांबेड येथे एका बागेमध्ये शेकरू प्राणी आढळला.
"प्रगणनेसोबत संशोधन अन् अभ्यासाची गरज" जंगलातील दाट झाडीचे पट्टे, उंच झाडे असलेला परिसर आणि कॅनोपी कनेक्टिव्हीटी असलेल्या निवासस्थानांना प्राधान्य देतात जे
त्यांना भक्षकापासून संरक्षण देतात. त्याचवेळी त्यांना अन्नाचा पुरवठा करतात. जीवनसाखळीसाठी पोषक असलेला अधिवास राजापूर-लांजा परिसरातील जंगलामध्ये असल्याने याठिकाणी
शेकरूचे वास्तव्य असल्याचे सांगितले जात आहे. लांजा येथे शेकरू एकटा आढळून असला तरी, सर्रासपणे शेकरू जोडीने आढळतो. त्यामुळे त्याच्या जोडीचे अन्य शेकरू त्या परिसरामध्ये असण्याची
दाट शक्यता असून त्यांचा वावर अनेक वर्षांपासून असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अशीच स्थिती ब्लॅक पँथरची आहे. गेल्या पंधरा वर्षांमध्ये ब्लॅक पँथरचा प्रत्यक्षदर्शी दोनवेळा झालेले दर्शन
पाहता त्यांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पर्यावरण वा वन्यजीव अभ्यासकांकडून सर्वेक्षण, संशोधन वा अभ्यास होणे गरजेचे आहे. तसेच ब्लॅक पँथर याच परिसरात का आढळतात यावर अभ्यास होणे आवश्यक आहे. तसेच वन्यप्राण्यांचे प्रगणन (मोजदाद) झाले तर त्याचा सविस्तर अभ्यासही होईल. शेकरू फळ खावून फळाच्या बिया जगलातून फेकून देतात. या बिया जंगलाच्या जंगलाच्या वेगवेगळ्या भागात पसरतात. त्यामुळे नवीन झाडांची वाढ होते आणि जंगलाची जैवविविधतता टिकून राहते. फुलांचे परागण होण्यास आणि त्यातून फळधारणा होऊन जंगलांत फळांची उपलब्धता होण्यासही ते सहाय्यभूत ठरतात. शेकरूची उपस्थिती वास्तव्याच्या जंगल परिसरात मुबलक फळे आणि चांगले पर्यावरण असल्याचे दर्शविते. शेकरूचे अस्तित्व जंगलातील प्राणीसृष्टीचे संतुलन राखण्यासाठी महत्त्वाचे मानले जाते.