
सावंतवाडी : शहरातील सालईवाडा येथील बेकायदेशीर बांधकामांबाबतच्या तक्रारींवर कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ श्रीमती शुभांगी गोपाळ नार्वेकर यांनी १५ ऑगस्ट २०२५ पासून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
सिटी सर्वे क्रमांक ४८७८ ते ४८८१ या जमिनींवर नियमबाह्य इमारती आणि कंपाऊंड वॉलचे बांधकाम झाले आहे. याबाबत चौकशी अहवाल देण्यास अधिकारी विलंब करत आहेत. तसेच या बेकायदेशीर कंपाऊंड वॉलमुळे पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडवला गेला आहे. या संदर्भात नगरपरिषदेकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई झालेली नाही असे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, शासकीय जमीन मोजणीच्या नकाशामध्ये बांधकाम क्षेत्र, हद्दखुणा, मोकळी जागा आणि विहीर यांसारख्या नोंदींमध्ये बनावटगिरी झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नगरपरिषद, भूमी अभिलेख कार्यालय, उपविभागीय कार्यालय आणि तहसीलदार कार्यालय यांसारख्या सरकारी कार्यालयांकडून दिशाभूल करणारी आणि विलंब लावणारी माहिती दिली जात असल्याच त्यांचे म्हणणे आहे. या सर्व प्रकारच्या अन्यायाविरोधात लोकशाही मार्गाने न्याय मिळवण्यासाठी त्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. यापुर्वी देखील अनेक उपोषण करून देखील केवळ आश्वासन दिली. तसेच शासनाच्या या धोरणामुळे एका वयोवृद्ध व महिलेला वारंवार उपोषणाची वेळ आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. प्रशासनाने या गंभीर बाबींची दखल घेऊन तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी नार्वेकर यांनी केली आहे.