
कुडाळ : युवा सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एक अत्यंत अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. कुडाळ तालुक्यातील आंदुर्ले गावाच्या सुकन्या, पखवाज विशारद कु. श्रुतिका श्रीकृष्ण मोर्ये, हिने 'युथ फेस्टिवल २०२५' मध्ये सुवर्णपदक पटकावून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. पखवाज एकल वादनात सुवर्णपदक मिळवणारी ती पहिलीच विद्यार्थिनी (महिला) ठरली आहे, ज्यामुळे संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळचे नाव महाराष्ट्रात गाजले आहे.
मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या ५८ व्या इंटर कॉलेज कल्चरल युथ फेस्टिवल मध्ये श्रुतिकाने हे यश संपादन केले. ‘क्लासिकल इन्स्ट्रुमेंटल सोलो, तालवाद्य’ प्रकारात तिने आपल्या पखवाज वादनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या स्पर्धेत राज्यभरातील ३६ अव्वल दर्जाच्या स्पर्धकांमध्ये तिचा सहभाग होता, तरीही तिने आपल्या उत्कृष्ट सादरीकरणाने सर्वांना मागे टाकले आणि अव्वल क्रमांक पटकावला.
श्रुतिकाच्या या अभूतपूर्व यशामुळे केवळ मुंबई विद्यापीठातच नव्हे, तर महाराष्ट्र राज्यात, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि कुडाळ तालुक्यातही तिचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे. तिच्या यशाने ती शिकत असलेल्या संत राऊळ महाराज महाविद्यालय आणि तिला संगीत शिक्षण देणाऱ्या प. पू. नामदेव महाराज संगीत विद्यालयाची मान अभिमानाने उंचावली आहे.
या यशामागे तिच्या अथक परिश्रमासोबतच तिला मिळालेले योग्य मार्गदर्शनही महत्त्वाचे ठरले आहे. तिचे आई-वडील, संत राऊळ महाराज महाविद्यालयातील शिक्षक वर्ग, आणि विशेषतः प. पू. नामदेव महाराज संगीत विद्यालयाचे संचालक गुरुवर्य आनंद मोर्ये गुरुजी यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि पाठिंबा तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा होता.
पखवाज विशारद श्रुतिका मोर्ये हिने प्राप्त केलेले हे यश निश्चितच जिल्ह्यातील इतर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रेरणा आणि योग्य दिशा देणारे ठरेल. तिने आपल्या मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर स्वतःच्या गावाचे आणि जिल्ह्याचे नाव उज्वल केले आहे.