
देवगड : महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा-२ अभियान स्पर्धेतील जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांकाचा पाच लाख रुपयांचा पुरस्कार जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेस पालकमंत्री नितेश राणे साहेब यांनी १ मे रोजी महाराष्ट्र दिनी ओरोस येथील शरदचंद्र पवार कृषिभवन सभागृहात संस्थाध्यक्ष ॲड.अजितराव गोगटे, सचिव-प्रवीण जोग, मुख्याध्यापक सुनील जाधव, महेश रानडे, शुभम धुरी, केदार आचरेकर यांना प्रदान केला.
याप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पाटील मुख्यकार्यकारी अधिकारी- श्री.रविंद्र खेबुडकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी-डॉ.गणपती कमळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
“ मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा “ टप्पा -२ या अभियानात दुसऱ्यांदा पुरस्कार प्राप्त करणारी जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशाला जिल्ह्यातील नामवंत प्रशाला असून गोगटे प्रशालेने अभियान काळात (अ) पायाभूत सुविधा (ब)शासन ध्येय धोरण अंमलबजावणी (क) शैक्षणिक संपादणुक यावर विविधांगी उपक्रम राबविले.
कचऱ्याचा पुनर्वापर करून गांडूळ खत प्रकल्प, छतावरील पावसाचे पाणी बोअरवेल मध्ये साठवण्याची अभिनव संकल्पना , अत्याधुनिक प्रयोगशाळा, शालेय परिसरात १०० पेक्षा जास्त पर्यावरण पूरक झाडांची लागवड, परसबागेतील भाजीपाल्याचा पोषणआहारात उपयोग, सीसीटीव्ही कॅमेरे, निळकंठ दीक्षित बास्केटबॉल व हॉलीबॉल क्रीडांगणाचे सुमारे १० लाख खर्चून आकर्षक काँक्रिटीकरण, उच्च विद्याभूषित अध्यापक वर्ग, आधारवैधता, सरल प्रणाली, यू डायस प्रणाली, महावाचन चळवळीतील गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड मधील प्रशालेचा सहभाग, मेरी माटी मेरा देश, विद्यार्थी व शालेय दप्तराचे अद्ययावतीकरण, स्वच्छता मॉनिटर, शिष्यवृत्ती परीक्षेतील उत्तीर्ण दर, NMMS परीक्षा, मुख्याध्यापक सुनील जाधव यांनी विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी केलेले संशोधन महाराष्ट्र राज्याने एकात्मिक पाठ्यपुस्तक संपूर्ण राज्यात लागू केले. अशा अनेक उपक्रमांमुळे गोगटे प्रशालेने संपूर्ण जिल्ह्यात नामवंत प्रशाला म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे.