कणकवली : नाटळ गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरातील वार्षिक हरिनाम सप्ताह 6 ते 14 फेब्रुवारी या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. हरिनाम सप्ताहानिमित्त गावातील चाकरमानी तसेच पैपाहुण्यांचे आगमन होणार असून यानिमित्त पुढील आठ दिवस अवघा नाटळ गाव भक्तीरसात न्हावून निघणार आहे.
गुरूवार 6 फेब्रु.रोजी स.10 वा. रथसप्तमीदिनी मंदिरात हरिनामसप्ताहानिमित्त विधिवत घटनास्थापना होणार आहे. या विधीने हरिनाम सप्ताहास प्रारंभ होणार असून बुधवार 12 फेब्रुवारीपर्यंत भजने, दिंड्या, चित्ररथ, ढोलवादन, लेझीम खेळ आदी विविध कार्यक्रम होणार आहेत. शुक्रवार 8 फेब्रुवारी या माघी एकादशी दिनापासून रोज रात्री श्री देव रामेश्वर माऊलीची पालखी निघणार आहे. गुरूवार 13 रोजी स.10 वा. हरिनामसप्ताहानिमित्त स्थापित घटाचे उत्तरपूजन होवून लगतच्या ग्रामनदीच्या डोहात घट उत्थापन, देवाचे स्नान, तिर्थप्रसाद वाटप असे कार्यक्रम होणार असून या दिवशी हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे. शुक्रवार 14 रोजी दुपारी हरिनामसप्ताहानिमित्त समराधना अर्थात महाप्रसाद होणार असून रात्री दशावतार नाटक होणार आहे. हरिनामसप्ताहनिमित्त मंदिर परिसरात विद्युत रोषणाई व आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
भाविकांची वाहने पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून सप्ताहनिमित्त थाटण्यात येणार्या विविध प्रकारच्या दुकानांसाठीही नियोजन करण्यात आले आहे. भाविकांना श्री देव रामेश्वराचे दर्शन घेण्यासाठी तसेच देवी माऊलीची ओटी भरण्यासाठी देवस्थान संचालक मंडळाने सुयोग्य नियोजन केले आहे. हरिनामसप्ताह सुरळीत पार पडण्यासाठी श्री देव रामेश्वर माऊली मित्रमंडळ व नाटळ ग्रामस्थ कार्यरत आहेत. भाविकांनी हरिनामसप्ताहास उपस्थित राहण्याचे आवाहन देवस्थानच्यावतीने करण्यात आलंय.