
दापोली : सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे संचलित न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज टाळसुरे या विद्यालयातील विद्यार्थी श्रेयस लाले व स्वितेश लाले या दोघांची 35 व्या किशोर गट राज्य अजिंक्य पद कबड्डी स्पर्धेकरिता रत्नागिरी जिल्ह्याच्या संघात निवड झाली आहे. या निवडीमुळे सदर खेळाडूंना राज्यस्तरावर खेळण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे विद्यालयात शिक्षण घेणारे अमर भारत क्रीडा मंडळ टाळसुरे या संघाचे खेळाडू श्रेयस लाले व स्वितेश लाले यांची किशोर गट राज्य अजिंक्यपद स्पर्धेकरिता रत्नागिरी जिल्ह्याच्या संघातून निवड करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे राज्यस्तरावर प्रतिनिधित्व करण्याची संधी या खेळाडूंना प्राप्त झाली आहे. रत्नागिरी जिल्हा व खेड तालुका कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने 35 वी किशोर गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन काळकाई कला क्रीडा केंद्र भरणे खेड येथे करण्यात आले होते . सदर स्पर्धेतून रत्नागिरी जिल्ह्य संघाची निवड करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा संघ नगरपरिषद मैदान मनमाड नाशिक येथे होणाऱ्या 35 व्या किशोर गट राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेकरिता जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. रत्नागिरी जिल्हा किशोर गट जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत अंतिम सामन्यात श्रेयस लाले, सार्थक कदम, स्वितेश लाले यांनी दमदार खेळ करत दापोली तालुक्याला अंतिम विजेतेपद मिळवून दिले होते.
यामुळेच दापोली तालुक्यामधून रत्नागिरी जिल्हा संघात सार्थक कदम, श्रेयस लाले, स्वीतेश लाले, कृपाळू चौगुले यांची तर किशोरी गट राज्य अजिंक्यपद स्पर्धेकरिता श्रेया मोरे हीची निवड करण्यात आली आहे. श्रेयश आणि स्वितेश हे दोघेही अमर भारत क्रीडा मंडळ टाळसुरे या मंडळाचे खेळाडू असल्याने अमर भारत क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर लाले तसेच विपुल सुर्वे, श्रीकांत तोडणकर, सुयोग लाले, प्रदेश आरेकर, राहुल तौसाळकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेत टाळसुरे विद्यालयाचा प्रभात पिंपळकर या खेळाडूने देखील उल्लेखनीय कामगिरी केली. जिल्हा संघात राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड झाल्याबद्दल सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे चे कार्याध्यक्ष चिपळूण संगमेश्वर चे आमदार शेखर निकम, सचिव महेश महाडिक, संचालक शांताराम खानविलकर, शालेय समितीचे अध्यक्ष जयवंत जालगावकर, सदस्य अशोक जाधव, विजयकुमार खोत, टाळसुरे विद्यालयाचे मुख्याध्यापक संदेश राऊत, रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सचिव नितीन बांद्रे ,दापोली तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष मंगेश मोरे, उपाध्यक्ष प्रभाकर लाले, दापोली तालुका कबड्डी पंचप्रमुख रुशाल उर्फ दादू सुर्वे यांनी सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या आहेत.