पुठ्ठ्यापासून साकारली श्रीराम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती !

श्री कलेश्वर विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांची कमाल !
Edited by: प्रसाद पाताडे
Published on: February 01, 2024 10:02 AM
views 454  views

कुडाळ : नुकत्याच झालेल्या श्री राम मुर्ती प्रतिष्ठापनेच्या साधनेबाबतच्या भावना दिवसेंदिवस अधिकच उजळत चालल्या आहेत. जनमानसात ही बाब अधिकच लोकप्रिय होत आहे. अयोध्या येथे श्रीरामांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होत असतानाच नेरूरपार केंद्र शाळा येथील श्री कलेश्वर विद्यामंदिरच्या बालचमुंनी नेरूरपार येथे अगदी हुबेहूब श्रीराम मंदिर प्रतिकृती साकारली असुन ही प्रतिकृती पुठठ्याची आहे. त्यांच्या या कलेचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.

संपुर्ण जगाचे लक्ष वेधणार्‍या श्रीराम मंदिर मुर्ती प्रतिष्ठाना सोहळा जगात लक्षवेधी ठरला. प्रभु श्रीराम हे भारता प्रमाणेच जगभरातील अनेक लोकांसाठी आदराचे स्थान बनत आहेत. यामुळेच अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनासाठी देश विदेशातुन मोठी गर्दी होत आहे. तमाम हिंदु बांधवांचे श्रध्दास्थान असलेल्या प्रभु श्री रामांचे अयोध्या येथील मंदिर आता केवळ अयोध्येतच नव्हे तर देशाच्या कानाकोपर्‍यात साकारत आहे. लोकांच्या मनामनात हे मंदिर रूजले असुन त्याचे प्रतिबिंब या मंदिराच्या प्रतिकृतीच्या माध्यमातुन उजळत आहे. नेरूरपार येथील कलेश्वर विद्यामंदिर नेरूरच्या विद्यार्थ्यांनी पुठठ्याचे अगदी हुबेहूब राम मंदिर साकारले आहे. यामध्ये इयत्ता सहावी मधील तत्नी संतोष सुकाळे, चौथी मधील मयुरेश संजय सुकाळे, तिसरी मधील मानसी संतोष सुकाळे या बालचमुंनी मेहनत घेतली. यातील तत्नी व मानसी गणेश मुर्तीकार संतोष सुकाळे यांच्या कन्या तर मयुरेश हा त्यांचा पुतण्या आहे.

हे संपुर्ण मंदिर पुठठ्याचे असुन अगदी हुबेहूब साकारण्यात आले आहे. बालचमुंची ही कल्पकता व यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम हा या भागात चर्चेचा विषय ठरला आहे. राम मंदिराची ही कलाकृती अयोध्येतील राममंदिराचे नेरूर मध्ये दर्शन घडवत आहे.