
सावंतवाडी : सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर यांचा सावंतवाडी ज्येष्ठ नागरिक संघामार्फत श्रावणबाळ पुरस्काराने सत्कार करण्यात आला. प्रा. सुभाष गोवेकर यांनी प्रकाश तेंडोलकर यांचा परिचय करून देताना रक्तदान चळवळ तसेच अनेक सामाजिक उपक्रमांबरोबरच कवी, लेखक असे साहित्यिक, वाचनालय चळवळ असे बहुआयामी व्यक्तिमत्व अशी ओळख करून दिली. यामुळेच हा सत्कार करण्यात येत असल्याचे सांगितले. सिंधु रक्तमित्र संस्थेविषयीही माहिती दिली. ही संस्था सिंधुदुर्गातच नव्हे तर महाराष्ट्रासह अगदी देशपातळीवरही कार्य करते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष बी. एन. तेली यांचे हस्ते प्रकाश तेंडोलकर यांचा सत्कार झाला. यावेळी सत्काराला उत्तर देताना तेंडोलकर यांनी हा ज्येष्ठांनी केलेला व सर्व जेष्ठांच्या उपस्थितीतला आजचा हा सत्कार बहुमूल्य असल्याचे सांगितले. यावेळी संस्था संस्थेचे कार्य, देहदान, अवयवदान, रक्तदानबाबत तेंडोलकर यांनी मार्गदर्शन केले. हा पुरस्कार संस्थेच्या रक्तदान चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांचा आहे, असे प्रतिपादन केले. यावेळी अनेक ज्येष्ठांनी देहदान व अवयवदानाचा संकल्प केला. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघ बी. एन. तेली, (उपाध्यक्ष), प्रकाश राऊळ (सचिव), सुधीर धुमे (सहसचिव), अरुण मेस्त्री (खजिनदार), गुरुदास पेडणेकर, अनंत माधव, सुभाष गोवेकर, दिगंबर पावसकर, सीमा नाईक, सुलभा टोपले, सुप्रिया धुमे, नारायण मालवणकर आदी उपस्थित होते.