कुडाळमध्ये रंगणार श्रावणमेळा..!

कुडाळ पंचायत समितीचे २३ ऑगस्ट रोजी आयोजन
Edited by: भरत केसरकर
Published on: August 18, 2023 20:01 PM
views 79  views

कुडाळ : कुडाळ पंचायत समितीच्या वतीने बुधवार, २३ ऑगस्ट २०२३ रोजी श्रावणमेळा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. याबाबतची माहिती कुडाळ पंचायत समिती प्रशासक तथा गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी गटविकास अधिकारी विजय चव्हाण म्हणाले की, यावर्षीचा "मेरी मिट्टी मेरा देश" या समर्पित भावनेतून "मातृभूमी को नमन, विरोंको वंदन" करणारा श्रावणमेळा कुडाळ येथील सिद्धिविनायक हॉल येथे बुधवार, २३ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. या श्रावणमेळ्यात रानभाज्या प्रदर्शन आणि पाककला कृती स्पर्धा आयोजित केली असून याच्या माध्यमातून कोकणामध्ये आढळणाऱ्या विविध रानभाज्या मांडण्यात येणार आहेत. तसेच या रानभाज्यांपासून पाककलाकृती तयार करून त्या जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश असल्याचे गटविकास अधिकारी विजय चव्हाण म्हणाले. या कार्यक्रमाद्वारे आम्ही वसुधेला वंदन करणार आहोत. यात अंदाजे किमान ५०० कलाकृती सादर होणार आहेत.

 या श्रावण महिन्यात देशभक्तीपर समूहगीत, समूह नृत्य स्पर्धा आयोजित केल्या असून कुडाळ तालुक्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील मुले याचे सादर करणार आहेत. यासाठी तालुक्यातील ६ बिट स्तरावर स्पर्धांचे आयोजन केले असून तालुक्यातील ३० माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळातील ६० संघातून जवळपास १८०० विद्यार्थी सहभागी झाले आहेत. या ६ बिट स्तरावरील विजेते ६ समूहगीत चमू आणि ६ समूह नृत्य चमच्या माध्यमातून ३०० मुले श्रावण महिन्यात आपले सादरीकरण करून वीरांना आणि मातृभूमीला वंदन करणार आहेत, अशी माहिती विजय चव्हाण यांनी यावेळी दिली.

यावेळी भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. कुडाळ तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतीतील १२२ गावातून प्रत्येक गावातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त दोन महिला आपल्या गावातील प्रातिनिधिक मृदा (माती) समारंभपूर्वक पंचायत समिती कुडाळ येथे एका अमृत कलशामध्ये गोळा करणार आहेत. हा मृदेचा अमृत कलश समारंभ पूर्वक राजधानी दिल्ली येथे पाठवण्यात येणार आहे अशी माहिती विजय चव्हाण यांनी दिली.

राज्यातील कुडाळ तालुका एकमेव असा तालुका आहे की त्यातील सर्व १२२ महसुली गावे स्वच्छतेमधील ओडीएफ प्लस प्लस, मॉडेल तसेच फाईव्ह स्टार झालेली असून संपूर्ण तालुका स्वच्छतेमधील फाईव्ह स्टार घोषित करण्यात येणार आहे. या श्रावण महिन्यात कुडाळ तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक तसेच संबंधित यंत्रणा या आनंदमेळ्यात सहभागी होणार आहेत अशी माहिती गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी दिली.