सावंतवाडी : लोकसभा, विधानसभेत एकत्र लढलेल्या भाजप-शिवसेनेत आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर रस्सीखेच सुरू झाली आहे. भाजपातील मोठ्या गटानं आमदार निलेश राणेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्यान मोठं खिंडार पडलं आहे. यानंतर लागलीच सिंधुदुर्गात आलेल्या भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका कमळा शिवाय होऊ नये असे आदेश दिलेत. त्यामुळे राज्यात पालकमंत्री पदावरून धुसफुस आसणाऱ्या महायुतीत यानिमित्ताने तळकोकणाचाही समावेश झाला आहे. पक्षवाढीसाठी दोन बलाढ्य पक्षांत चांगलीच रस्सीखेच सुरू आहे.
कुडाळ तालुक्यातील भाजपच्या शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी भारतीय जनता पार्टीला सोडचिट्टी देत शिवसेना पक्षाच धनुष्यबाण हाती घेतले. कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश घेण्यात आला. यावेळी शिवसेना आमदार श्री. राणे यांनी ''मी शांत आहे, मला शांत राहू द्या ! मी माझा पक्ष वाढवत असून जे एकनाथ शिंदे यांना अभिप्रेत आहे ते करत आहे. महाराष्ट्रामध्ये संघटना कशी असावी ती संघटना सिंधुदुर्गसारखी असावी. ही संघटना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे. मी हात दिला तर तुम्हीही हात पुढे करावा. माजी आमदारांना देखील मी शुभेच्छा दिल्या असुन अजून निलेश राणेंनी किती शांत व्हाव अस मिश्किल विधान त्यांनी केलं.
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपला खिंडार पडून दिवस उलटण्यापूर्वी भाजपचे महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यकारी अध्यक्ष, माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होत मोठं विधान केलं. ''भाजप या पक्षात कोणी दादा किंवा भाई आगेबढो अशा घोषणा न देता केवळ भारतीय जनता पार्टी आगे बढो अशा घोषणा दिल्या पाहिजेत. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका कमळा शिवाय होऊ नये असे विधान भाजप कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केल. सिंधुदुर्गात भाजपला शिवसेनेन पाडलेल्या खिंडारानंतर श्री. चव्हाणांच विधान चर्चेच ठरलं. जिल्हा परिषद, ग्रामपंचायत व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका कमळाशिवाय होऊ देऊ नका. यापुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यात शतप्रतिक्षत भाजपा असली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. मी जसा पूर्वी आपल्या सोबत होतो त्याच्यापेक्षा मोठ्या ताकदीने आपल्यासोबत असेन, त्यामुळे कोणीही चिंता करू नका. आपल्या सारख्या कार्यकर्त्याच्या जीवावर ज्याप्रमाणे लोकसभा, विधानसभेत कोकणात यश मिळाले. त्याचप्रमाणे येणाऱ्या निवडणुकामध्ये केवळ कमळच जिंकून येईल असे मी आपल्यावतीने बोलतो असं माजी मंत्री श्री. चव्हाण म्हणाले.
यावर माजी मंत्री, शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी देखील भाष्य केलं. रवींद्र चव्हाण यांच विधान ऐकलेलं नाही. मात्र, भाजप आणि शिवसेना कायम एकत्र राहावी हीच माझी भूमिका आहे. काही निर्णय वरिष्ठ पातळीवर ठरतात. त्यामुळे विनाकारण कटुपणा येऊ नये. काहीकाळ बंगल्याचे शिफ्टींग सुरू असल्यानं मी इथे नव्हतो. मध्यंतरीच्या काळातली माहिती घेऊन मी बोलेन. मात्र, भाजप आणि शिवसेना कायम एकत्र राहावी हीच माझी भूमिका आहे. दोन्ही पक्षांनी एकत्र राहून निवडणूका लढवाव्यात. शक्यतो, उबाठा शिवसेनेची लोक प्रवेश करून आली तर आनंद आहे. तसेच काही निर्णय वरिष्ठ पातळीवर ठरतात. त्यामुळे विनाकारण कटुपणा येऊ नये असंही मत श्री. केसरकर यांनी व्यक्त केले. जिल्ह्यातील सेना- भाजपच्या नेत्यांची विधानं पाहता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांत 'ऑल इज वेल' नसल्याचे चित्र दिसून आलं. पक्ष संघटना वाढीसाठी जोरदार रस्सीखेच महायुतीच्या घटक पक्षांतच असल्याने राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय ठरला. आ.निलेश राणे, माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या या विधानानंतर खासदार नारायण राणे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह महायुतीचे श्रेष्ठी कोणती भूमिका मांडतात ? याकडे लक्ष लागून राहिले आहे.