सिंधुदुर्गातील तिन्ही आमदार महायुतीचे असतील !

केसरकर व्हिजन असलेला नेता : माजी आमदार शिवराम दळवी
Edited by: विनायक गांवस
Published on: November 12, 2024 14:02 PM
views 222  views

सावंतवाडी : सावंतवाडी, कुडाळ आणि कणकवली विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी होतील. मी या तिन्ही मतदारसंघात मित्रमंडळीची गाठभेट घेऊन संवाद साधला असल्याची माहिती माजी आमदार शिवराम दळवी यांनी दिली. श्री. दळवी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात दोन वेळा शिवसेनेचे आमदार होते. सध्या ते भाजपमध्ये आहेत.

दळवी म्हणाले, मी महायुतीचे उमेदवार शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयात भेट घेऊन गाठीभेटीना सुरूवात केली. त्यानंतर कुडाळ - मालवण आणि कणकवली - देवगड - वैभववाडी मतदारसंघात माझ्या ओळखीच्या मित्रमंडळीना भेटलो. लोकांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व महाराष्ट्र राज्यात चांगले काम सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही आमदार महायुतीचे विजयी होतील. महायुतीला साकारात्मक विचारांचा फायदा मिळणार आहे. लाडकी बहीण, मुलींना मोफत शिक्षण अशा विविध योजना राबविल्या आहेत त्यामुळे जनता महायुतीला भक्कम पाठिंबा देणार आहे असे त्यांनी सांगितले.

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात मला दोन वेळा मतदारांनी विजयी केले आहे. त्यामुळे मतदार संघात फेरफटका मारताना महायुतीचे उमेदवार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे पारडे जड असल्याचे जाणवते. व्हिजन असलेला नेता म्हणून केसरकर यांच्याकडे पाहिले जाते. तसेच शांत आणि संयमी व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जाते. त्यांच्या बद्दल मतदारांना विश्वास आहे, असे शिवराम दळवी यांनी सांगितले. माझ्यावर महायुतीच्या नेत्यांनी आणखी जबाबदारी दिली आहे. तेथेही मी जाणार आहे असे श्री दळवी यांनी सांगितले.