
मालवण : शिवराज्याभिषेक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त श्री शिवराज मंच मालवण आयोजित आणि निर्मित शिवराज भूषण या ऐतिहासिक महानाट्याचे सलग दोन प्रयोग दि. ६ व ७ जून रोजी मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण येथे संपन्न होणार आहेत. यानिमित्त मामा वरेरकर नाट्यगृहात श्री शिवराज मंच व हिंदवी आर्ट्स यांच्या वतीने शिवसाहित्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून त्याचे उदघाटन किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणो त्सव समितीचे अध्यक्ष गुरुनाथ राणे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रदर्शनात छत्रपती शिवाजी महाराजांची शस्त्रे, पुस्तके, प्रतिमा, चित्रे, माळा, मुर्त्या आणि व इतर शिवसाहित्य यांचा समावेश असून प्रदर्शनाबरोबर विक्रीही होणार आहे. हे प्रदर्शन ७ जून रोजी सायंकाळपर्यंत सुरु राहणार आहे. गुरुनाथ राणे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पना करून व श्रीफळ वाढवून प्रदर्शनाचे उदघाटन झाले. यावेळी शिवराज मंचचे भूषण साटम, भाऊ सामंत, लेखक रणजित हिर्लेकर, दिग्दर्शक गणेश मेस्त्री, हिंदवी आर्टस् चे सर्वेसर्वा आणि शिवव्याख्याते प्रमोद काटे, समीर शिंदे, संजय शिंदे, हेमंत कोळंबकर, यांच्यासह शिवराज भूषण नाटकातील कलाकार उपस्थित होते.
छत्रपाती शिवाजी महाराज यांच्या काळातील समकालीन कवी भूषण यांच्या जीवनावर व शिव पराक्रमावर आधारित शिवराज भूषण या नाटकाला नाट्य रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून सर्वांनी या नाटकासह शिवसाहित्य प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी भूषण साटम यांनी केले.