श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ व अग्रेसर भारत यांच्या तर्फे पुण्यामध्ये त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त छत्रपती संभाजी महाराजांच्या धगधगत्या संघर्षाची गाथा अतिशय प्रभावीपणे नाट्यातून उलगडणार्या ' इथे ओशाळला मृत्यू ' च्या नाट्यप्रयोगाच आयोजन करण्यात आलं आहे.
प्रा. वसंत कानेटकर यांच्या प्रतिभावान लेखणीतून साकारलेलं आहे,गेली अनेक दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार महान, अजरामर,ऐतिहासिक नाटक म्हणून नावलौकिक प्राप्त केलेलं नाटक आहे. डॉ काशिनाथ घाणेकर यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका त्याकाळी एका वेगळ्याच उंचीवर नेली. त्याचबरोबर प्रभाकर पणशीकरानी औरंगजेब ही भूमिका अजरामर केली.आज ही संभाजी महाराज म्हणजे डॉ घाणेकर आणि औरंगजेब म्हणजे पणशीकर हे समीकरण जुन्या जाणत्या नाट्य प्रेमिंच्या मनात घर करून आहे.
शिवगणेश प्रॉडक्शन्स ने या अजरामर नाट्या चे शिवधनुष्य लीलया पेलत ,तोच काळ पुन्हा उभा करत रसिक,चोखंदळ प्रेक्षकांचे प्रचंड कौतुक,प्रेम मिळवत नावलौकिक मिळवलाआहे. या पूर्वीही संपूर्ण नाटकालाच वन्स मोअर मिळवत वेगळाच इतिहास घडवला तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या श्री क्षेत्र वढू येथील पुण्य समाधी चरणी महाराजांच्या झंझावाती जीवन चरित्राचे अफलातून सादरीकरण करत मानवंदना दिली. संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण नाट्यगृह पुणे येथे अलोट गर्दीत कलासेवा सादर केली.आपल्या राजाचा पराक्रम,बलिदान याचं जिवंत सादरीकरण पाहून प्रत्येक प्रयोगानंतर प्रेक्षकांना अश्रू अनावर होतात,प्रेक्षक सर्व विसरून चरणावर नतमस्तक होतात. ही किमया नाट्यदिग्दर्शक आणि संभाजी महाराजांची भूमिका हुबेहूब साकारणारे श्री गणेश ठाकूर यांनी साधली आहे.त्यांना अतिशय उमदी साथ देत सर्वच कलाकारांनी आपल्या भूमिकेत अक्षरशः जीव ओतला आहे म्हणूनच की कलाकृती आज प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य मिळवण्यात यशस्वी झाली आहे.
अशा या सर्वश्रुत कलाकृतीचे खास त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पुण्यामध्ये श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ व अग्रेसर भारत व्यासपीठ यांनी अतिशय मोठ्या प्रमाणात आयोजन केलेलं आहे. लोकमान्य टिळकांनी सुमारे १३० वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे कार्यवाह श्री सुधीर थोरात व अग्रेसर भारत व्यासपीठ चे श्री विनीत गाडगीळ व श्री सुनील देवभानकर यांनी पुण्यामध्ये अतिशय वैभवशाली आयोजन केलेले आहे. नाट्य प्रयोगाचे उद्घाटन सुप्रसिध्द सिनेदिग्दर्शक दिगपाल लांजेकर यांच्या शुभहस्ते होणार आहे. फत्तेशिकस्त,फर्जंद, पावनखिंड,सुभेदार,शेर शिवराय असे एकापेक्षा एक सरस ऐतिहासिक चित्रपट देऊन पुन्हा एकदा नवीन पिढीला आपल्या इतिहासाची ओळख करून देण्यात त्यांनी यश मिळविले आहे.सध्याचे आघाडीचे दिग्दर्शक म्हणून त्यांची ओळख आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमार दलाचे प्रमुख कान्होजी राजे आंग्रे यांचे आताच्या पिढीतले वंशज व श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ,पुणे चे अध्यक्ष श्री रघुजी राजे आंग्रे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.मंडळाचे सरकार्यवाह व ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री पांडुरंग बलकवडे यांचीही उपस्थिती असणार आहे.
सदर प्रयोग संध्याकाळी ठीक ६.३० वाजता घरकुल लॉन्स,म्हात्रे ब्रीज,पुणे येथे खास त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त होणार असून विनातिकीट सर्वांसाठी खुला आहे.तरी पुण्यातील सर्व रसिक प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणावर याचा लाभ घ्यावा असे आवाहन दोन्ही संस्थांतर्फे करण्यात आले आहे. नाट्यप्रयोगानंतर दीपोत्सव साजरा होऊन कार्यक्रमाची सांगता होणार आहे.