शिवम प्रभाग संघाने महिलांना स्वतः च्या पायावर उभं राहण्याच दिलं बळ !

सर्वसाधारण वार्षिक सभेस मोठ्या संख्येने महिला उपस्थित
Edited by: विनायक गांवस
Published on: October 20, 2022 17:14 PM
views 279  views

सावंतवाडी : शिवम प्रभाग संघ माजगावने महिलांना स्वतः च्या पायावर उभ राहण्याच बळ दिलं आणि उमेद अभियानाचा महत्वाचा उद्देश जो महिलांचे सक्षमीकरण करणे, हा आहे तो खऱ्या अर्थाने गेल्या काही वर्षांच्या अथक मेहनतीने साध्य केला असल्याच्या भावना या प्रभाग संघाच्या बैठकीला उपस्थित सर्वच मान्यवरांनी व्यक्त केल्या. यावेळी व्यासपीठावर उपस्थित कार्यक्रमाचे प्रमूख मान्यवर उद्योजकता विकास केंद्राचे, बँक ऑफ इंडिया आरसेटी चे पाटकर सर यांनी कौतुक करत प्रभाग संघाच्या कामाचे कौतुक करत विविध व्यवसायां संबंधी माहिती दिली तसेच मार्गदर्शन केले तर निवृत्त कृषि अधिकारी काका परब यांनी सुरु असणाऱ्या कृषि योजना बरोबर शेतकरी अपघात विम्याविषयी सविस्तर माहिती देताना प्रभाग संघाच्या महिलांनी केलेल्या नियोजन बद्ध कार्यक्रमाचे कौतुक केले. यावेळी व्यासपीठावर उमेद अभियान तालुका व्यवस्थापक ठाकरे सर यांनीही आपले मनोगत व्यक्त करतांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले तसेच ग्रामसंघाचे कौतुक केले.यावेळी पाडवी सर, स्वाती मॅडम, गवंडे सर, पाटकर मॅडम, माजी सभापती रमेश गांवकर,चराठा सरपंच बाळू वाळके, माजगाव सरपंच दिनेश सावंत, सरमळे सरपंच सौ. सावंत, ओटवणे माजी सरपंच रविन्द्र म्हापसेकर, संजय कानसे, प्रभाग समन्वयक अपर्णा भंडारी मॅडम, प्रभाग संघाच्या कोषाध्यक्ष सपना गावडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. 

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन सावंतवाडी अंतर्गत शिवम प्रभाग संघ माजगाव च्या या सर्वसाधारण वार्षिक सभेस मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या तसेच तालुक्यातील प्रभाग समन्वयक उपस्थित होते. या प्रभाग संघात ७ ग्रामसंघ समाविष्ट असून सावली ग्रामसंघ माजगाव, श्री कलेश्वर ग्रामसंघ वेत्ये, उत्कर्ष ग्रामसंघ ओटवणे, सातेरी देवी ग्रामसंघ सोनुर्ली, जागृती ग्रामसंघ माजगाव, ओमसाई ग्रामसंघ चराठा, समाधान ग्राम संघ सरमळे आदी ग्रामसंघ समाविष्ट आहेत . यावेळी विनायक समूह सोनुर्ली, प्रसन्ना समूह ओटवणे, सिद्धीविनायक समूह माजगाव यांना उत्कृष्ट समूह म्हणून गौरविण्यात आले तर या सात ग्रामसंघापैकी वेत्ये,सावली ग्रामसंघ माजगाव, आणि चराठा या ग्रामसंघाना उत्कृष्ट ग्रामसंघ म्हणून गौरविण्यात आले.तर उत्कृष्ट उत्पादक गट म्हणून वसुंधरा सरमळे,कला कौशल्य माजगाव , अनमोल वेत्ये , कोंकण रत्न माजगाव यांना गौरविण्यात आले.यावेळी अनेक महिलानी आपले विचार मांडताना आपल्या मनोगतात अभियानामुळे आपणाला काय मिळालं आपण फक्त चूल मुल असच जगत असताना उमेद अभियानाने खऱ्या अर्थानी जगण्याचं बळ, काहीतरी करण्याची स्फूर्ती आणि संकटाना सामोर जाण्याची शक्ति दिल्याच्या भावना व्यक्त केल्या . या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रभाग समन्वयक भंडारी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सी. आर.पी, प्रभाग संघा च्या पदाधिकारी, लिपिका, सर्व केडर यांनी प्रयत्न केलेत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेटिना अँथनी पिंटो यानी केले तर आभार नितिशा नाईक यांनी मानलेत.